तळेगाव स्टेशनवर प्रवाशी बँगेत तरुणीचा मृतदेह

By Admin | Updated: May 7, 2014 21:37 IST2014-05-07T20:35:34+5:302014-05-07T21:37:42+5:30

तळेगाव रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक २ वर लाल रंगाच्या बंद बेवारस प्रवाशी बॅगेत अज्ञात तरूणीचा मृतदेह सापडला आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

The body of a woman in the passenger buses at Talegaon station | तळेगाव स्टेशनवर प्रवाशी बँगेत तरुणीचा मृतदेह

तळेगाव स्टेशनवर प्रवाशी बँगेत तरुणीचा मृतदेह

तळेगाव स्टेशन (जि.पुणे): तळेगाव रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक २ वर लाल रंगाच्या बंद बेवारस प्रवाशी बॅगेत अज्ञात तरूणीचा मृतदेह सापडला आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
रेल्वेस्थानकावर सफाई कामगार किसन वाळुंद्रा यांना सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वच्छतागृहाजवळील दगडी बैठक बाकास उभी केलेली प्रवाशी बॅग दिसली. त्यांनी या बॅगेची माहिती रेल्वेचे हवालदार बिपीन सखवार यांना दिली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवरील वर्तमानपत्र विक्रेता संतोष माने व झिरो पोलीस राजेंद्र घुले यांच्या मदतीने ती बॅग पोलीस मदत केंद्रात आणण्यात आली. बॅग उघडली असता असता त्यात असणारा मृतदेह पाहून माने व घुले यांची तारांबळ उडाली.
पुणे रेल्वेचे विभागीय पोलीस अधिकारी शामकुमार निपुंगे, पोलीस निरीक्षक अभय परमार व पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिंदे तसेच रेल्वेचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे, उपनिरीक्षक रामदास शेळके घटनास्थळी त्वरित आले. त्यांनी तपास सुरू झाला. पुणे शहर व ग्रामीण विभागाचे श्वान पथकाला पाचारण केले. एका श्वानाने फलाट क्रमांक २ च्या पश्चिमेच्या टोकापर्यंत माग काढला, तर दुसर्‍याने शेजारच्या तळेगाव एसटी बसस्थानकापर्यंत माग काढला.
स्टेशनवर सीसी कॅमेरे असते, तर तपास सुकर झाला असता. तरीही तपास लवकरच लावू, असा विश्वास विभागीय पोलीस अधिकारी शामकुमार निपुंगे यांनी व्यक्त केला.
तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व वायसीएम पिंपरी येथे शवविच्छेदनासाठी महिला डॉक्टर उपलब्ध न झाल्याने मृतदेह ससून हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात आला. पुण्याहून येणार्‍या रेल्वेने ती बॅग आणली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
तरूणी दाक्षिणात्य असावी
तरूणीचे हात नायलॉन दोरीने बांधलेले तर तोंडावर पांढरा रुमाल बांधलेला आहे. अंगात मरुन पोपटी रंगाचा कुडता व नक्षीचा हिरव्या रंगाचा सलवार आहे. नाकात उजव्या बाजूला सोन्याची रिंग आहे. त्यावरून ती दाक्षिणात्य असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. वय सुमारे १५ ते १८ असावे. हातापायाच्या नखांना पॉलिश केलेले आहे. चेहर्‍यावरून ग्रामीण भागातील अथवा कामगार वर्गातील असावी, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला.
बॅग सुमारे अडीच फूट लांब व दीड फूट रुंदीची आहे. तिचा रंग लाल असून रेक्झीनची पोलस्कोड कंपनीची ही बँग कुलुप बंद होती.

Web Title: The body of a woman in the passenger buses at Talegaon station