दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळला
By Admin | Updated: June 30, 2016 21:59 IST2016-06-30T21:59:43+5:302016-06-30T21:59:43+5:30
तालुक्यातील टेंभूर्णा शिवारातील विहिरीत दोन वर्षाच्या अनोळखी चिमुकल्याचा मृतदेह गुरुवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाबाबत पोलिसांनी

दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळला
खामगाव : तालुक्यातील टेंभूर्णा शिवारातील विहिरीत दोन वर्षाच्या अनोळखी चिमुकल्याचा मृतदेह गुरुवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाबाबत पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील टेंभूर्णा शिवारात राहूल खंडेलवाल यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत सायंकाळच्या सुमारास दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत बकऱ्या चारणाऱ्या इसमास दिसून आला. याबाबत टेंभूर्णा पोलिस पाटलाने घटनास्थळी पाहणी केली व खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, पोलिस निरीक्षक सचिंद्र शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ, पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे, बबनराव कटारे, सचिन लोंढेकर, संतोष गव्हाळे, प्रविण गवई, रतन गिरी आदी पोलिसांचा ताफा त्वरित घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी मृत बालकाचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. त्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेह स्थानिक सामान्य रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
निर्दयतेचा कळस..
विहिरीतून बाहेर काढलेल्या चिमुकल्याच्या मृतदेहाची पाहणी केली असता या चिमुकल्याचे दोन्ही पाय दोरानी बांधलेले दिसून आले. त्याचप्रमाणे कमरेला दगड बांधून एका कापडामध्ये गुंडाळलेला सदर मृतदेह आढळून आला. त्यामुळे या चिमुकल्याला जिवाने मारण्याचाच बेत आखण्यात आला होता असे दिसून येत आहे.