विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्याचा मृतदेह काढला
By Admin | Updated: August 27, 2014 01:01 IST2014-08-27T01:01:56+5:302014-08-27T01:01:56+5:30
एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची अमानुष हत्या केल्यानंतर स्वत:ही रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह पोलिसांनी उकरून काढला. आज या घडामोडीमुळे हे थरारक

विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्याचा मृतदेह काढला
एकतर्फी प्रेमाचा थरार : हत्येनंतर आत्महत्या
नागपूर/खापरखेडा : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची अमानुष हत्या केल्यानंतर स्वत:ही रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह पोलिसांनी उकरून काढला. आज या घडामोडीमुळे हे थरारक प्रकरण अधिकच गडद झाले. हर्षल खुशाल गुरडकर (वय २०) असे मृत आरोपीचे नाव आहे. तो पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी येथील रहिवासी होता.
गावातीलच प्रिया तुळशीराम रांगणकर (वय १८) या युवतीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तो चडफडत होता. प्रिया खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला शिकत होती.गुरुवारी (२१ आॅगस्ट) कॉलेज सुटल्यानंतर प्रिया मैत्रिणींसोबत खापरखेडा येथील रेल्वे चौकी परिसरातून शिकवणीला जात होती. आरोपी हर्षलने मोटरसायकलवरून (एमएच-४०/एस-८५९३) तिच्याजवळ आला. त्याने तिच्यावर चाकूचे सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने प्रियाला कामठीच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. शनिवारी मध्यरात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे सिंगोरी पारशिवनी पंचक्रोशीत प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला. आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाईची मागणी होऊ लागली. संतप्त नागरिकांनी त्यासाठी खापरखेडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन आपला रोष व्यक्त केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी आरोपी हर्षलला तातडीने शोधून काढण्याचे आदेश देऊन विविध भागात वेगवेगळ्या पोलीस चमू रवाना केल्या होत्या.
अखेर मृतदेहच मिळाला
नागपूर ग्रामीण पोलीस आरोपी हर्षलचा ठिकठिकाणी शोध घेत असतानाच नागपूर शहर पोलिसांनाही त्याच्याबाबत माहिती कळवली होती. प्रियावर हल्ला केल्यानंतर हर्षल गुरुवारी मोटरसायकलने कळमेश्वरमार्गे काटोलच्या दिशेने निघून गेला होता. दरम्यान, सोनखांब शिवारातील रेल्वे लाईनवर शुक्रवारी (दि. २२) दुपारी अनोळखी तरुणाचा मृतदेह कटलेल्या अवस्थेत आढळून आला. ‘त्या’ तरुणाने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्याची वेळीच ओळख न पटल्याने रेल्वे पोलिसांनी नागपुरातील मोक्षधाम येथे दफनविधी आटोपला. ही माहिती कळताच खापरखेडा पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर ‘तो’ मृतदेह हर्षलचाच असल्याचे स्पष्ट झाले.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी तहसीलदार, डॉक्टर व पंच मोक्षधाममध्ये हजर होते. त्याच्या हातावर ‘एच’ लिहिले होते, त्यावरूनच ती ओळख पटली. (प्रतिनिधी)
तो मृतदेह कुणाचा ?
हर्षलच्या मृतदेहाची होणार डीएनए टेस्ट
आज पोलिसांनी उकरून काढलेला मृतदेह हर्षलचाच असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. मात्र, प्रियाचे नातेवाईक ते मान्य करायला तयार नाहीत. हर्षल अत्यंत क्रूर होता. त्यामुळे त्याने आपले कपडे ‘त्या‘ मृतदेहावर चढवले असावे आणि पळून गेला असावा, अशी शंकावजा तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्याकडे केली. डॉ. सिंग यांनी त्याची दखल घेतली. हे प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून हर्षलच्या मृतदेहाचे सॅम्पल घेऊन डीएनए टेस्ट करवून घेण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. हर्षल आणि त्याच्या नातेवाईकांचे डीएनए टेस्ट केल्यानंतर जो मृतदेह सापडला तो हर्षलचाच आहे की नाही, हे स्पष्ट होईल. तसेच कुणाच्या मनात कोणती शंका राहाणार नाही. विनाकारण आरोप प्रत्यारोपही होऊ नये, यासाठी डीएनए टेस्टचा निर्णय ग्रामीण पोलिसांनी घेतल्याचे डॉ. आरती सिंग यांनी आज लोकमतशी बोलताना सांगितले.