बोरीवलीत पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह
By Admin | Updated: September 1, 2014 04:07 IST2014-09-01T04:07:33+5:302014-09-01T04:07:33+5:30
बोरीवली पूर्व येथील नॅशनल पार्कच्या पुलाखाली रविवारी सकाळी एका ५ वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला.

बोरीवलीत पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह
मुंबई : बोरीवली पूर्व येथील नॅशनल पार्कच्या पुलाखाली रविवारी सकाळी एका ५ वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला. ही मुलगी पालक व सात बहीण-भावांसह नॅशनल पार्कजवळील पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाखाली राहत होती. ती राहत असलेल्या जागेच्या १०० मीटर अंतरावर पुलाखाली तिचा मृतदेह सापडला. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या लोकांनी मृतदेह पाहिला व या संदर्भातील माहिती कस्तुरबा पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठविला.
मुलीच्या अंगावरील जखमांमुळे तिच्यावर काही दुष्कृत्य झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यावरच त्याचे कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस
शोध घेत असल्याची माहिती परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली. (प्रतिनिधी)