हद्दीच्या वादातून मृतदेह नऊ तास रुळावर होता पडून
By Admin | Updated: September 5, 2016 22:06 IST2016-09-05T22:06:49+5:302016-09-05T22:06:49+5:30
चालत्या रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झालेल्या वृध्दाचा मृतदेह केवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वादावरून तब्बल नऊ तास रेल्वे रुळावर पडून होता.

हद्दीच्या वादातून मृतदेह नऊ तास रुळावर होता पडून
उस्मानाबाद, दि. ५ - चालत्या रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झालेल्या वृध्दाचा मृतदेह केवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वादावरून तब्बल नऊ तास रेल्वे रुळावर पडून राहिल्याचा प्रकार पुणे-सोलापूर मार्गावरील कुर्डूवाडीनजीक घडला. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा येथील रुकसेन कृष्णा बडे हे त्यांच्या नातेवाईकांसह तोरंब्याकडे येण्यासाठी पुणे-सोलापूर या पॅसेंजर रेल्वेने २८ आॅगस्ट रोजी (रविवारी) दौंडवरून निघाले होते. गाडीत फारशी गर्दी नसल्याने बहुतांश प्रवाशांना झोपेसाठी जागा मिळाली होती. पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही रेल्वे कुर्डूवाडी जंक्शनवर पोहोंचली. तेथे स्थानकावर चहा विक्रेत्याने रेल्वे डब्यात येवून काहींना चहाही दिला.
मात्र, जाताना रेल्वेचे दार त्याच्याकडून उघडे राहिले. सव्वाचारच्या सुमारास रुकसेन बडे (वय ६५) हे बाथरूमला जाण्यासाठी निघाले. मात्र, झोपेत असलेल्या बडे हे बाथरूमचा दरवाजा समजून रेल्वे डब्याच्या दरवाजाकडे गेले आणि धावत्या रेल्वेतून खाली पडले. हा प्रकार एका सहप्रवाशाने पाहिल्यानंतर त्यांनी अन्य प्रवाशांना व बडे यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. काहींनी रेल्वेची आपत्कालीन चैन खेचल्यानंतर घटनास्थळापासून जवळपास तीन किमी अंतरावर जावून ही रेल्वे थांबली.
रेल्वेतील बडे यांच्या नातेवाईकांनी सदर अपघाताची माहिती रेल्वेच्या संबंधितांना दिल्यानंतर रेल्वे चालकाने नजीकच्या वडसिंगा स्टेशन मास्तरशी संपर्क साधला. त्यांनी दोन गार्ड सोबत देवून नातेवाईकांना घटनास्थळाकडे पाठविले. मात्र, तेथे गेल्यानंतर सदर अपघाताची जागा आमच्या हद्दीत नसल्याचे रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगत आपण कुर्डूवाडी पोलिस स्टेशनला जावून तेथे घटनेची नोंद करा, असे सूचविले. यावरून हे नातेवाईक कुर्डूवाडीत पोहोंचले.
मात्र, तेथेही पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी रेल्वेकडून सदर घटनेची नोंद असलेले पत्र आणण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यामुळे या नातेवाईकांनी वडसिंगे रेल्वे स्थानक गाठून तेथून हे पत्र घेतले व पुन्हा कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गेले. तेथे गेल्यानंतर कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पंचनाम्यासाठी आले. मात्र, त्यांनीही हद्दीचाच मुद्दा उपस्थित करीत हे घटनास्थळ माढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथे जावून घटनेची नोंद करा, असे सांगितले.
यानंतर हे नातेवाईक माढा पोलिस ठाण्यात गेले. तेथे सपोनि पालकर यांना घटना सांगितल्यानंतर त्यांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घटनास्थळी येवून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी माढा येथील रुग्णालयात पाठविला. तेथेही शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे दुपारी तीन वाजेच्या सुमारास शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पुणे-सोलापूर पॅसेंजरमधून पडून काकांचे अपघाती निधन झाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या मुद्यामुळे मृतदेह तब्बल नऊ तास रेल्वे रूळावर पडून होता. अपघातप्रसंगी संबंधित यंत्रणेकडून तातडीने मदत व सहकार्य मिळणे अपेक्षित असते. मात्र, नियमावर बोट ठेवल्यामुळे लोकांची हेळसांड होते. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा.
- शीला बडे, सोलापूर