वाशी खाडीपुलाखाली आढळला मृतदेह
By Admin | Updated: May 21, 2016 03:02 IST2016-05-21T03:02:38+5:302016-05-21T03:02:38+5:30
मुंबईच्या भुलेश्वर परिसरातून दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह वाशी खाडीत आढळून आला आहे.

वाशी खाडीपुलाखाली आढळला मृतदेह
नवी मुंबई : मुंबईच्या भुलेश्वर परिसरातून दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह वाशी खाडीत आढळून आला आहे. रेल्वे पुलावरून उडी मारून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वाशी पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर अनेक दिवस पाण्यात पडून असल्यामुळे मृतदेह छिन्नविछीन्न झालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला.
हिरा जगबहाद्दूर सिंग (४०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते भुलेश्वर परिसरातील राहणारे असून त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पायधुनी पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुमारे दहा दिवसांपासून ते बेपत्ता होते. शुक्रवारी सकाळी वाशी खाडीमध्ये रेल्वे पुलाखाली एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खाडीच्या किनारी असलेल्या झाडीमध्ये हा मृतदेह अडकून पडला होता. त्यानुसार वाशी अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले होते. पायधुनीतून बेपत्ता असलेल्या हिरा सिंग यांची माहिती मिळून मृतदेहाची ओळख पटल्याचे पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांनी सांगितले.