बोर्डाच्या कोऱ्या उत्तर पत्रिका गायब
By Admin | Updated: March 19, 2015 02:32 IST2015-03-19T02:32:12+5:302015-03-19T02:32:12+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून या परीक्षेत मोठी गडबड आहे.

बोर्डाच्या कोऱ्या उत्तर पत्रिका गायब
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून या परीक्षेत मोठी गडबड आहे. परीक्षा केंद्रातून कोऱ्या उत्तर पत्रिकाच गायब झाल्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहेत. हा प्रकार लक्षात येताच विभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व परीक्षा केंद्रांवर उत्तर पत्रिका पोहोचवल्या जातात. प्रत्येक केंद्राला विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिल्या जातात. उत्तर पत्रिका उपलब्ध करून देत असतांना त्या मोजण्याऐवजी त्यांचे वजन केले जाते. त्यामुळे कुठे किती उत्तर पत्रिका दिल्या आहेत. याची माहिती बोर्डाकडे राहत नाही.
विशेष म्हणजे कुठल्याही उत्तर पत्रिकेमध्ये अनुक्रमानुसार क्रमांक राहत नसल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोणत्या क्रमांकाची उत्तर पत्रिका कोणत्या परीक्षा केंद्राला देण्यात आली, याची माहितीही काढता येत नाही. याचा लाभ घेत काही परीक्षा केंद्रांमधून उत्तर पत्रिका गायब केल्या जातात. त्या विद्यार्थ्यांना विकल्या जातात. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. परंतु अजूनही हा प्रकार बोर्डाच्या नजरेत आलेला नाही. असे प्रकार विशेषत: ग्रामीण भागांमध्ये होतात.
बोर्डातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षापासून बोर्डात अध्यक्ष व सचिव नसल्याने याप्रकारच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने पाहण्यात आले नव्हते. गेल्या १७ मार्च रोजी कोऱ्या उत्तरपत्रिका गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. भरारी पथकाला १२ वीच्या परीक्षेच्या दरम्यान नागपुरातील एका परीक्षा केंद्रात एका विद्यार्थ्याकडे दोन उत्तरपत्रिका आढळून आल्या. त्यापैकी एक कोरी होती तर दुसरी लिहिलेली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने दोन्ही उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या; सोबतच याची माहिती विभागीय अधिकाऱ्यांनाही फोनवर देण्यात आली. अधिकाऱ्यांना या उत्तरपत्रिका सील करण्याचे आदेश देण्यात आले. दोन्ही उत्तरपत्रिका तातडीने बोर्डाला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. यासंबंधात बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, एका विद्यार्थ्याजवळ दोन उत्तरपत्रिका आढळून आल्या; सोबत या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचेही स्पष्ट केले. माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या दोन्ही उत्तरपत्रिका मागविण्यात आल्या आहेत. चौकशीदरम्यान संबंधित विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांनाही विचारणा केली जाईल. उत्तरपत्रिका गायब होण्यासंबंधात मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करण्यास नकार दिला.