BMC ELECTION RESULT : शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरेंच्या वहिनीचा विजय
By Admin | Updated: February 23, 2017 18:23 IST2017-02-23T15:57:30+5:302017-02-23T18:23:40+5:30
मुंबई महानगर पालिकेसाठी वार्ड क्रमांक 123 मधून वहिनीला उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेचे विभाग प्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती

BMC ELECTION RESULT : शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरेंच्या वहिनीचा विजय
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिकेसाठी वॉर्ड क्रमांक 123 मधून वहिनीला उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेचे विभाग प्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेने मोरे यांची पक्षातून हकालपट्टी करत विद्यमान नगरसेविका डॉ. भारती बावधाने यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर सुधीर मोरे यांनीही वहिनी स्नेहल मोरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केल्याने वादाची ठिणगी पडली होती. गेल्या काही दिवसांपासून मोरे आपल्याला धमकावत असल्याची तक्रार डॉ. बावदाने यांच्यासह कार्यकर्त्यांनी विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात केली होती.
तसेच सोमवारी रात्री सुधीर मोरे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप शिवसैनिकांनी केल्याने हा वाद विकोपाला गेला होता. मतदानाच्या दिवशी हा वाद आणखीनच पेटला होता. मतदान संपल्यानंतर वॉर्ड क्रमांक 123 चे उपशाखाप्रमुख पाटील यांच्यावर मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना उपचारांसाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करून पार्कसाईट पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो, हे लक्षात येताच मोरे यांच्या बाजूने असलेल्या काही महिलांनी जखमी अवस्थेतील पाटील यांच्या विरोधात अश्लील शिवीगाळ आणि वर्तन केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मोरे यांच्या महिला कार्यकर्त्यांनी तक्रारीवरून पार्कसाईट पोलिसांनी पाटील यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर किरण मोरे, प्रवीण मोरे आणि संदीप दळवी यांना बेड्या ठोकल्या आहेत. हा वाद ताजा असतानाच अखेर सुधीर मोरेंच्या बाजूने निकाल लागल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. त्यांच्या वहिनी स्नेहल मोरे यांनी तब्बल 1,020 मतांनी आघाडी घेतली. त्यांच्या विजयामुळे शिवसेनेचा अंतर्गत वाद वाढला आहे.