मराठवाड्यात धान्य बाजारात निरुत्साह
By Admin | Updated: July 16, 2015 04:05 IST2015-07-16T04:05:39+5:302015-07-16T04:05:39+5:30
पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजारात समितीत निरुत्साह दिसत आहे. खरीप पिकांची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी

मराठवाड्यात धान्य बाजारात निरुत्साह
- प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजारात समितीत निरुत्साह दिसत आहे. खरीप पिकांची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी शिल्लक शेतीमाल विकणे थांबविले आहे. खरेदीदारांनीही आखडता हात घेतल्याने दररोज साधारणपणे ५ कोटींची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेत सध्या केवळ ४५ ते ५० हजारांचे व्यवहार होत आहेत.
पावसाने दगा दिल्याने शेतातील पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. विभागात दुबार पेरणीचे संकट उभे आहे. पावसाचे कोणतेही चिन्ह नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान्य, कडधान्य विक्रीला न काढण्याचा निर्णय घेतला. त्याचा धान्य बाजारावर परिणाम झाला आहे. दैनंदिन आवक जवळपास ९५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे गहू, तूर, हरभरा, उडीद, मूग, हरभरा व तूरडाळीचे भाव कडाडले आहे.
मागील ३० वर्षांत अशी कठीण परिस्थिती उद्भवली नव्हती. तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती आहे; पण धान्याच्या आवकेवर एवढा मोठा परिणाम पहिल्यांदाच जाणवत आहे, असे खरेदीदार शिखरचंद सेठी यांनी सांगितले.
उत्पन्न घटले : जून २०१४ मध्ये ५़३९ लाख रुपये मार्केट फी जमा झाली होती. जून २०१५ मध्ये बाजार समितीचे उत्पन्न घटून २़३५ लाख रुपये झाले. जुलैमध्ये १५ दिवसांत अवघी २० हजार ११६ रुपयांची मार्केट फी जमा झाली आहे. आठवडाभरापूर्वी फळ-भाजीपाला मार्केटमध्ये दररोज १० ते १२ हजार रुपये मार्केट फी जमा होत होती. ती सध्या ५ ते ६ हजार रुपयांवर आली होती.