नवजात ‘नकोशी’चा पित्याकडून खून
By Admin | Updated: August 17, 2015 00:49 IST2015-08-17T00:49:23+5:302015-08-17T00:49:23+5:30
नवजात मुलीची पित्यानेच हत्या करण्याची माणुसकीला काळीमा फासणारी संतापनजक घटना स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील दाताडा खुर्द येथे घडली

नवजात ‘नकोशी’चा पित्याकडून खून
सेनगाव (जि. हिंगोली) : नवजात मुलीची पित्यानेच हत्या करण्याची माणुसकीला काळीमा फासणारी संतापनजक घटना स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील दाताडा खुर्द येथे घडली. पोलिसांनी डिगांबर तुकाराम कदम (५३) या नराधम पित्याला अटक केली आहे.
सेनगाव तालुक्यातील दाताडा (खु.) येथे प्रयागबाई डिगांबर कदम (४६) यांची १५ आॅगस्टला पहाटे चारच्या सुमारास राहत्या घरी प्रसुती झाली. त्यांचा मोठा मुलगा २० वर्षांचा आहे. आपण व आपली पत्नी पन्नाशीच्या घरात असल्याने जन्मलेल्या मुलीचा भविष्यात कसा सांभाळ करणार, या भीतीपोटी डिगांबरने नवजात मुलीची गळ्यावर वार करून हत्या केली तसेच खुनाचा प्रकार दडपण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोटच्या मुलीचा पतीनेच खून केल्याचे प्रयागबाईच्या लक्षात येताच तिने हंबरडा फोडला. त्यातून खुनाला वाचा फुटली. प्रयागबाई यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना हिंगोलीच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पित्याच्या या अमानवी कृत्यामुळे घाबरलेल्या सतीश डिगांबर कदम याने सेनगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक करून घरात लपवून ठेवलेल्या नवजात मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. (प्रतिनिधी)