शहरात शस्त्राऐवजी दगडाने ठेचून होताहेत खून
By Admin | Updated: July 20, 2016 01:45 IST2016-07-20T01:45:52+5:302016-07-20T01:45:52+5:30
सराईत गुन्हेगारांकडे पिस्तूल, गावठी कट्टा, त्याचबरोबर चाकू, सुऱ्या, तलवारी, गुप्ती, कोयते अशी हत्यारे असतात

शहरात शस्त्राऐवजी दगडाने ठेचून होताहेत खून
पिंपरी : सराईत गुन्हेगारांकडे पिस्तूल, गावठी कट्टा, त्याचबरोबर चाकू, सुऱ्या, तलवारी, गुप्ती, कोयते अशी हत्यारे असतात. या हत्यारांऐवजी खुनाच्या घटनांमध्ये दगड अथवा सिमेंट ब्लॉकचा वापर केल्याचे अलीकडच्या गुन्ह्यांमध्ये निदर्शनास आले आहे. याउलट उच्चशिक्षित अभियंत्यांकडे पिस्तूल, कट्टे आढळून येऊ लागले आहेत. पिस्तुलातून गोळ्या झाडून डॉक्टर पत्नीचा अभियंत्याने खून केल्याची घटना वाकड येथे घडली. गुन्ह्यांसाठी वेगळीच पद्धती अवलंबली जात असल्याचे विविध गुन्हेगारी घटनांच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे भरदुपारी १० ते १२ जणांच्या टोळक्याने डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून विनायक कैलास पाटोळे (वय १८, रा. दत्तनगर, चिंचवड) या तरुणाचा खून केला. चिंचवड येथील महावीर चौकाजवळील पेट्रोलपंपाजवळनागरिकांनी खुनाच्या घटनेचा थरार अनुभवला. याला काही दिवसांचा अवधी उलटला नाही, तोच गोल्डमॅन दत्ता फुगे याचा भारतनगर, दिघी येथे डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. या अलीकडच्या काळात घडलेल्या ताज्या खुनांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत झालेल्या खुनाच्या घटनांचा आढावा घेतला असता, सराईत गुन्हेगारसुद्धा गुन्ह्यात वेगळीच पद्धती अवलंबत असल्याचे निदर्शनास आले आहे. दत्ता फुगे याच्या निर्घृण खुनाच्या घटनेनंतर दोन दिवसांनी विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बालाजी हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या अजय श्रावण वाघमारे (वय १८) या तरुणाचा देहूरोड येथील कचरा डंपिंग मैदानाजवळ मृतदेह आढळूून आला. त्याच्या डोक्यात गंभीर जखमा होत्या.
उधार पैसे मागितल्याच्या कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना निगडी ओटास्कीम येथे घडली होती. अंकुश सीतप्पा नाटेकर (वय २७, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव होते. अंकुशच्या डोक्यालासुद्धा जबर मार लागल्याचे निदर्शनास आले होते. वल्लभनगर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून नीलेश बाळू कुसेकर (वय २४) या तरुणाचा खून झाला होता. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. एप्रिल महिन्यात कासारवाडीत मयूर इंगवले या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेचा उलगडा झाला, त्यात तृतीयपंथीयाने खून केल्याचे उघडकीस आले. डोक्याला मार लागल्याने मयूरचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासात पुढे आले.
>उच्चशिक्षितांकडे पिस्तूल
वाकड येथे १३ जुलैला एका संगणक अभियंत्याने बंदुकीतून गोळी झाडून डॉक्टर पत्नी अंजली पाटीदार (वय ३४) हिचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याकडे पिस्तूल आले कोठून? त्याला पिस्तुलाची गरज का भासली, असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
>नैराश्यातून आत्महत्या
सांगवीत एका अभियंत्याने नैराश्येपोटी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली आहे. ज्यांच्याकडे पिस्तूल आहेत, असे सराईत गुन्हेगार हत्यारांचा वापर करत नाहीत. जे सराईत नाहीत ते हत्यारांचा वापर करू लागले असल्याचे आतापर्यंतच्या घटनांतून निदर्शनास आले आहे.