ब्लड आॅन कॉल केवळ नावालाच !
By Admin | Updated: August 1, 2016 17:42 IST2016-08-01T17:42:44+5:302016-08-01T17:42:44+5:30
गरजू रुग्णांना वेळेवर आणि शासकीय शुल्कामध्ये रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जीवन अमृत सेवा (ब्लड आॅन कॉल) योजना ७ जानेवारी २0१४ पासून सुरू केली.

ब्लड आॅन कॉल केवळ नावालाच !
>- नितीन गव्हाळे,
अकोला, दि.१ - गरजू रुग्णांना वेळेवर आणि शासकीय शुल्कामध्ये रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जीवन अमृत सेवा (ब्लड आॅन कॉल) योजना ७ जानेवारी २0१४ पासून सुरू केली. १0४ क्रमांकावर संपर्क साधून गरजु रूग्णांना एका तासाच्या आता रक्त मिळाले पाहिजे. असा या योजनेचा हेतू आहे. परंतु रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ही सेवा जीवन अमृत सेवा नसून जीवन मृत सेवा असल्याचा अनुभव येत आहे. एका रूग्णाच्या नातेवाईकाने १0४ क्रमांकावर कॉल करूनही त्यांना तीन दिवस रक्त मिळाले नाही. ब्लॅड आॅन कॉल योजना केवळ नावालाच असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
अकोला तालुक्यातील खेकडी गावातील निकीता सुरेश मोरे या युवतीला आजारपणामुळे शहरातील खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी ती अशक्त असल्यामुळे तिला रक्त देण्यास सांगितले. नातेवाईकांनी रक्तासाठी ब्लड आॅन कॉलच्या १0४ क्रमांकावर संपर्क साधला आणि एबी पॉझिटिव्ह रक्तगटाची मागणी केली. नातेवाईकांना रक्त लवकरच पाठविण्यात येईल. असे सांगण्यात आले. परंतु दोन दिवस उलटूनही रूग्णाला रक्त मिळाले नाही. अखेर नातेवाईकांनी खासगी रक्तपेढी रक्तपिशवी निकीताला रक्त चढविले. त्यामुळे शासनाने सुरू केलेली ही योजना गरजु रूग्णांना रक्त पुरवठा करण्यात अपयशी ठरली आहे. रूग्णांना वेळेवर रक्त मिळत नसेल तर या योजनेवर शासन कशासाठी लाखो रूपयांचा खर्च करीत आहे. रक्ताची बाटली रुग्णाचा जीव गेल्यावर मिळणार का? असा सवाल रूग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा सुरू केली. त्यामध्ये १0४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आवश्यक त्या गटाचे ठिकाणी रक्त उपलब्ध करून दिले जाते. दूरध्वनी केलेल्या परिसराच्या ४0 किलो मीटर परिघात रक्त उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. मात्र, अलीकडे १0४ या क्रमांकावर अनेकदा संपर्क करून हा क्रमांक लागत नाही. कधी कधी हा संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले जाते. काहींना आलेल्या अनुभवानुसार दूरध्वनी उचलल्यानंतर रक्त मागणीची माहिती घेतली जाते. पुढे काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देणारी ही योजना नावालाच असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. मात्र, केवळ चांगल्या प्रकारे न चालविल्याने त्यांचा लाभ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना घेता येत नसल्याचे चित्र आहे.