रक्ताच्या नात्यानेच सांडवले रक्त
By Admin | Updated: July 16, 2014 01:15 IST2014-07-16T01:15:39+5:302014-07-16T01:15:39+5:30
थरारक खून सत्राने हादरलेल्या उपराजधानीत आज पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या. विशेष म्हणजे, हे दोन्ही खून सख्ख्या नातेवाईकांनीच केले. कळमन्यात सख्ख्या चुलत भावाने खून केला.

रक्ताच्या नात्यानेच सांडवले रक्त
कळमन्यात चुलत भावाने जरीपटक्यात सुनेने केला सासूचा खून
नागपूर : थरारक खून सत्राने हादरलेल्या उपराजधानीत आज पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या. विशेष म्हणजे, हे दोन्ही खून सख्ख्या नातेवाईकांनीच केले. कळमन्यात सख्ख्या चुलत भावाने खून केला. तर, जरीपटक्यात सूनेने वृध्द सासूला निर्दयपणे ठार मारले. रक्ताच्या नातेवाईकांनीच रक्त सांडवल्याने मृत आणि आरोपीच्या परिवाराला जबर मानसिक धक्का बसला आहे. कळमन्यातील पुनापूर रोडवर राहाणारा आकाश प्राण पाटील (वय २४) याने आपल्या सख्ख्या चुलत बहिणीसोबत लग्न केले होते.
त्यामुळे दोन्ही घरच्या मंडळींमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. या दोघांनी नात्याला काळीमा फासल्याची दोन्ही घरच्या मंडळीची भावना होती. त्यामुळे तरुणीचा भाऊ प्रतीक हंसराज पाटील तसेच स्वप्निल मूलचंद देशभ्रतार आणि सूरज लेनदास भवते (वय ३२, रा. दुर्गानगर, कळमना) हे तिघे रविवारी रात्री ११ वाजता आकाशच्या घरी आले. तू सख्खा चुलत भाऊ आहे.
डोक्यावर काठीचे फटके बसल्यामुळे आकाश गंभीर जखमी झाला. त्याला धंतोलीतील शुअरटेक इस्पितळात दाखल करण्यात आले. येथे दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज सकाळी आकाशने प्राण सोडला. त्याची आई वंदना प्राण पाटील यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी प्रतीक पाटील, स्वप्निल देशभ्रतार आणि सूरज भवते या तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.
सून झाली वैरीण
इंदोरा झोपडपट्टीतील गल्ली नंबर २ मध्ये सुलोचना सुधाकर निकाळजे (वय ७०) आणि तिची सून अलका राजू निकाळजे (वय ४४) या जेतवन बौद्धविहाराजवळ राहातात. आज सकाळी वृध्द सुलोचना पाण्याच्या ड्रममधून बादलीने पाणी काढत होत्या. यावेळी त्यांच्या हातून खाली पाणी पडत होते. ते पाहून अलकाने त्यांना पाणी खाली फेकू नको,असे म्हटले. सुलोचना यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सासू-सूनेत वाद पेटला. परिणामी अलकाने सासूला प्लास्टिकच्या बादलीने मारहाण केली. तेवढ्यावर तिचा राग शांत झाला नाही म्हणून नंतर तिने वृध्द सासूचे डोके भिंतीवर आपटले. परिणामी वृध्द सुलोचना यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने झोपडपट्टीत खळबळ निर्माण झाली. अलकाचा नवरा राजू (वय ४४) याने तिच्याविरुद्ध जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अलकाला अटक केली. (प्रतिनिधी)
...अन् आक्रित घडले
आकाश आणि त्याच्या चुलत बहिणीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ते संधी मिळताच बाहेर निघून जायचे. निरंतर आॅनलाईन (मोबाईलवरून) संपर्कात राहायचे. सख्खा चुलत भाऊ - बहीण असल्यामुळे त्यांच्यावर कुणाचा संशय नव्हता. मात्र, अलीकडे दोघांचेही बिंग फुटले. त्यानंतर दोन्हीकडून दोघांना विरोध होऊ लागला. त्यामुळे या दोघांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप लग्न उरकले. लग्नानंतर ते आपापल्या घरीच राहात होते. तरीसुध्दा घरच्यांना त्यांच्या लग्नाची गोष्ट माहीत झाली अन् पुढे हे आक्रित घडले.