अंध पाटील यांनी केले बातमीपत्रवाचन
By Admin | Updated: January 5, 2016 02:18 IST2016-01-05T02:18:17+5:302016-01-05T02:18:17+5:30
पुणे आकाशवाणी केंद्रावर सोमवारी इतिहास घडला. हा इतिहास घडविला तो ६२ वर्षीय अंध धनराज पाटील यांनी बातमीपत्राचे वाचन करून आकाशवाणीवरून ही बातमी जशी हीट झाली

अंध पाटील यांनी केले बातमीपत्रवाचन
पुणे : पुणे आकाशवाणी केंद्रावर सोमवारी इतिहास घडला. हा इतिहास घडविला तो ६२ वर्षीय अंध धनराज पाटील यांनी बातमीपत्राचे वाचन करून आकाशवाणीवरून ही बातमी जशी हीट झाली, तशीच सोशल मीडियावरुनही हिट झाली. या बातमीला लाइक करत मित्रमंडळीत शेअरही केले.
लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त धनराज पाटील यांना आकाशवाणीवरुन बातमीपत्र प्रसारीत करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. आकाशवाणीवरुन अंध व्यक्तीने बातमीपत्र वाचनाची देशातील ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी गुजरातमधील अहमदबाद केंद्रावरुन अंध व्यक्तीने बातमीपत्र प्रसारीत केले होते. पाटील यांना वयाच्या ७ व्या वर्षी अंधत्व आले. त्यानंतर त्यांनी ब्रेल लिपी आत्मसात केली. कालांतराने येरवडा कारागृहात शिक्षित व्यक्तींना बे्रल लीपीचे ते प्रशिक्षण देऊ लागले. या आधी श्रोत्याच्या भूमिकेत होता, आकाशवाणीवरुन बातमीपत्र वाचन करण्याची संधी मिळाली आहे, हे समजल्यानंतर आनंद झाला अशा भावना व्यक्त करुन ते म्हणाले़ सुरुवातीला खरेतर दडपण आले होते पण नितीन केळकर, मनोज क्षीरसागर यांच्या प्रोत्साहन आणि सहकार्यामुळे हे शक्य झाले. बातम्यांचे वाचन कसे केले जाते, कुठे विराम घेतला जातो याचे सूक्ष्म निरिक्षण केले. त्याप्रमाणे सराव केला. बातमीपत्राचे वाचन करू शकू अशी अखेरीत खात्री झाली.
ब्रेलमध्ये लिहिण्याची साधने वेगळी आहेत. लिखाणाचा सराव होण्यासाठी दररोज रायटिंग फ्रेम आणत होतो. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या लिहून काढल्या. बातमी वाचनाचा केवळ चार-पाच दिवस सराव केला आणि सोमवारी बातमीपत्राचे वाचन केले. आकाशवाणीवर आवाज ऐकून परिवारातील सदस्यही रोमांचित झाले. पुण्यासह बाहेरगावाहून फोन आले. पुना ब्लाइंड असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन पंड्या यांनीही समाधान व्यक्त केल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)