ब्लॅकमेलर टोळीचा पर्दाफाश

By Admin | Updated: October 9, 2014 00:53 IST2014-10-09T00:53:31+5:302014-10-09T00:53:31+5:30

मदतीची याचना करून महिलेमार्फत एखाद्याला बोलावून घ्यायचे. त्याचे आक्षेपार्ह अवस्थेत फोटो काढायचे, नंतर त्याला बदनामीचा धाक दाखवून ब्लॅकमेल करायचे, अशी कार्यपद्धत असलेल्या

Blackmailer busted | ब्लॅकमेलर टोळीचा पर्दाफाश

ब्लॅकमेलर टोळीचा पर्दाफाश

गायक गजाआड : कथित समाजसेवक, पोलिसासह चार फरार
नागपूर : मदतीची याचना करून महिलेमार्फत एखाद्याला बोलावून घ्यायचे. त्याचे आक्षेपार्ह अवस्थेत फोटो काढायचे, नंतर त्याला बदनामीचा धाक दाखवून ब्लॅकमेल करायचे, अशी कार्यपद्धत असलेल्या टोळीतील एकाला जरीपटका पोलिसांनी अटक केली. या टोळीचा म्होरक्या, कथित समाजसेवक आणि एका पोलिसासह चार आरोपी फरार आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत तायडे (वय ५३, रा. नागपूर) हे वेकोलिमध्ये उमरेडला नोकरी करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांना शिल्पा नावाच्या महिलेचे वारंवार फोन येत होते. आपल्याला नोकरीची गरज असल्याचे सांगून, तिने मदत करण्याची गळ घातली होती. तायडे यांनी आपल्या हातात नोकरी लावून देण्याचे नाही, असे स्पष्ट सांगून तिला टाळले. मात्र, ती त्यांच्या मागेच लागली. एकदा भेटू, असे म्हणत तिने त्यांना भेटीला येण्याचा आग्रह धरला.
त्यानुसार तायडे शिल्पाला भेटण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी कमाल चौकात गेले. एका रेस्टॉरंटमध्ये चहापाणी घेतल्यानंतर शिल्पाने त्यांना ‘येथे गर्दी आहे. मला पर्सनल प्रॉब्लेम सांगायचे आहेत’, असे सांगून सायंकाळी आपल्या दुचाकीवर बसवले. शिल्पाने तायडेंना समतानगरातील एका घरात नेले. तेथे तिने भलताच प्रकार सुरू केला. तेवढ्यातच दोन आरोपी तेथे पोहोचले.
शिल्पासोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून आरोपींनी त्यांना मारहाण केली, नंतर पोलिसांना फोन करण्याचे भासवत दोन साथीदारांना बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे आणखी दोघे तेथे पोहोचले.
या चौघांनी तायडेंना आपल्या वाहनात बसवून जरीपटका ठाण्यासमोर नेले. त्यांना वाहनातच बसवून ठेवून एक जण पोलीस ठाण्यात गेला.
पोलिसाची एन्ट्री
काही वेळेत एक पोलीस कर्मचारी वाहनाजवळ आला. त्याने पोलिसी खाक्या दाखवला. प्रकरण गंभीर असल्याचे सांगून कारवाईसाठी ठाण्यात चलण्यास सांगितले. कारवाई झाल्यास सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळणार,
हे लक्षात आल्यामुळे तायडे गयावया करू लागले. त्यांनी आरोपींना प्रकरण बाहेरच निपटवा, अशी विनंती केली. त्यानुसार आरोपींनी त्यांना तीन लाखांची मागणी केली. तायडेंनी पैसे देण्याची तयारी दाखविली.
आरोपींनी त्यांना १० नंबर पुलाजवळ नेले. एका दिवशी एटीएममधून ४० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नसल्यामुळे तायडेंकडून त्यांनी ४० हजार रुपये काढून घेतले, नंतर आरोपींनी त्यांना कोराडी मार्गावरील एका रेस्टॉरंटमध्ये नेले. तेथे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खानेपिणे केले.
दुसरा दिवस उजाडल्यावर आरोपींनी तायडेंना दुसऱ्या एटीएममध्ये नेले. यावेळी पुन्हा ४० हजार रुपये काढून घेतले, नंतर तायडेंना चेक मागितले. बदनामीच्या धाकाने घाबरलेल्या तायडे यांनी तेवढ्या रात्री घरातून चेकबुक आणून आरोपींना २ लाख २० हजारांचे चेक लिहून दिले.
दुसऱ्या दिवशी बँकेतून रक्कम काढल्यानंतर चेक परत करण्याचे ठरले होते. तायडेंनी रक्कम देण्यासाठी दुसऱ्या दिवशी आरोपींना फोन केला. मात्र, आरोपींना संशय आल्यामुळे त्यांनी ‘अभी बिझी है’ असे सांगून टाळले. (प्रतिनिधी)
प्रकरण आयुक्तांकडे
आपला दोष नसताना आपल्याला सापळ्यात अडकवून, मारहाण करून तीन लाख रुपये हडपले जात असल्याचे शल्य तायडेंना बोचू लागले. त्यामुळे त्यांनी सरळ पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी तत्काळ जरीपटक्याचे ठाणेदार भटकर यांना फोन करून कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार भटकर यांनी एटीएम तसेच रेस्टॉरंटचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. ते पाहून त्यांनाही धक्का बसला. या प्रकरणातील आरोपींचा म्होरक्या कथित समाजसेवक नेहमीच जरीपटका ठाण्यात येऊन आदळआपट करतो. त्यामुळे भटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपींना जेरबंद करण्यासाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी जरीपटक्यातील भीमचौकात तायडेकडून २ लाख २० हजार रुपये घेण्यासाठी दिनेश बाबाचंद नागदेवे (वय ४५) हा आरोपी पोहोचला; बाकीचे काही अंतरावर उभे राहिले. पोलिसांनी दिनेशच्या मुसक्या बांधल्या. लांबा पेट्रोल पंपाजवळ राहतो. त्याला ठाण्यात आणल्यानंतर त्याने कथित समाजसेवक ओमी, जरीपटक्यातील एक पोलीस कर्मचारी आणि शिल्पासोबतच आवळेचेही नाव सांगितले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Blackmailer busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.