साताऱ्यात म्हणे ‘ब्लॅक मनी’ होतोय ’व्हाईट’!
By Admin | Updated: October 6, 2014 22:32 IST2014-10-06T21:57:48+5:302014-10-06T22:32:30+5:30
अनेकांची फसवणूक : ‘युएसची’ दीड करोडची रक्कम बाजारपेठेत

साताऱ्यात म्हणे ‘ब्लॅक मनी’ होतोय ’व्हाईट’!
दत्ता यादव - सातारा -विधानसभा निवडणुकीची सगळीकडे धामधूम सुरू असतानाच युएसवरून तब्बल दीड कोटी रुपये सातारच्या बाजारपेठेत आले असून नोटेवर केमिकल टाकल्यानंतर ब्लॅकमनी व्हाईट होत असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. एवढेच नव्हे तर संपूर्ण ब्लॅक असलेली नोट केमिकल टाकल्यानंतर पूर्वस्थितीत होते, अशा भूलभुलैय्या दाव्यांमुळे अनेकजणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
स्वीस बँकेमध्ये अनेकांनी आपला काळा पैसा ठेवल्याचे सर्वश्रुत आहे. हा काळा पैसा नेमका काय, हे सर्वसामांन्याना समजण्यापलीकडे असते. कर बुडवून, अवैध मार्गाने कमविलेल्या पैशाला काळा पैसा असे आपण मानतो. मात्र हा काळा पैसा नावाप्रमाणे खरोखरच काळ्या रंगाचा असतो, हे सध्या सातारमधील बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत आहे. या काळ्या नोटांनी युवक, युवती आणि व्यावसायिकांना अक्षरश: वेड लावले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी अनेकजण ब्लॅक नोट व्हाईट कशी होईल, यासाठी धडपडत आहेत.
सातारच्या बाजारपेठेत युएसवरून तब्बल दीड करोड रुपये आले असल्याचा दावा अनेक नागरिक करीत आहेत. संपूर्ण काळा रंग असलेल्या नोटेवर केमिकल टाकल्यानंतर ती नोट मूळ रूपात येते. हे विदेशी चलन असून पुणे, मुंबई येथील बँकेत या नोटा बदलून मिळतात. मात्र ज्यांना हा काळा पैसा पाहिजे. त्यांनी पाच हजारांपासून दोन लाखांपर्यंत भारतीय चलन द्यायचे. त्या बदल्यात त्यांना भारतीय चलन दुप्पट, तिप्पट मिळते. म्हणजे एखाद्याने पाच हजार रुपये दिले तर त्याला पन्नास हजार रुपये मिळतात, असे आमिष दाखविले जात आहे. त्यामुळे हा काळा पैसा खरेदी करण्याकडे अनेकांची अक्षरश: चढाओढ सुरू आहे. मात्र हा काळा पैसा केवळ काळा कागदच आहे, हे जेव्हा त्या खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येते, तेव्हा पश्चातापाशिवाय त्याच्या हातात काहीच पडत नाही.
अनेकांच्या घरात या काळ्या पैशांच्या थप्पी लागल्याचे बोलले जात आहे. मोठ-मोठ्या व्यावसायिकांनी या नोटा खरेदी केल्या आहेत. त्यामुळे हे विदेशी चलन खरोखरचे असेल, या आशेवर अनेकजण मूग गिळून गप्प आहेत. मात्र या ब्लॅकमनीमध्ये काळेबेरे आहे, असे ज्यांना समजले, ते लोक यापासून सावध आहेत. परंतु अद्यापही काहीजण या काळ्या पैशाच्या मोहाला बळी पडत आहेत.
पोलिसांचे आवाहन...
अशा प्रकारचा काळा पैसा कोणत्याही बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत नाही. आणि काळी नोट तर अस्तित्वातच नाही. त्यामुळे अशा खुळचट आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन रितसर तक्रार द्यावी, जेणेकरून या थोतांड टोळीचा छडा लावून इतर लोकांची फसवणूक टाळता येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सातारा शहरात अशा प्रकारचे काळ्या नोटांचे बंडल आले आहेत.