बीकेसीत हायब्रीड बससेवा लवकर
By Admin | Updated: December 26, 2014 04:30 IST2014-12-26T04:30:38+5:302014-12-26T04:30:38+5:30
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)मध्ये पर्यावरणाला पूरक ठरणारा बससेवा प्रकल्प आता एक पाऊल पुढे सरकला आहे.

बीकेसीत हायब्रीड बससेवा लवकर
जमीर काझी, मुंबई
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)मध्ये पर्यावरणाला पूरक ठरणारा बससेवा प्रकल्प आता एक पाऊल पुढे सरकला आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या उपक्रमामध्ये परिसरात विविध तीन रेल्वे स्टेशनपासून बीकेसीपर्यंतच्या बसमार्गाचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध पाच कंपन्यांनी
या मार्गावर संकरित (हायब्रीड)
बसेस पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक किंवा डिझेलवर चालणाऱ्या अथवा दोन्हींचा समावेश असलेल्या बसेस असणार आहेत.
बससेवा पुरविण्याबाबत काही कंपन्यांनी प्राथमिक सादरीकरण मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केले आहे. नव्या वर्षामध्ये त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्राधिकरणातील सूत्रांकडून सांगण्यात आले. कुर्ला, सायन आणि वांद्रे या तीन उपनगरीय स्थानकापासून बीकेसीपर्यंत प्रदूषणविरहित बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुकीची कोंडी व वाढत्या प्रदूषणापासून नागरिकांची सुटका होणार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत बीकेसीचा परिसर हा वाणिज्यिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, विविध क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे जाळे या ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एमएमआरडीएने नोव्हेंबर २०११मध्ये स्वत:च्या बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र विविध कारणांमुळे हा प्रकल्प प्रलंबित राहिल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत राहिल्याने तो मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार प्राधिकरणाने केलेल्या आवाहनानुसार काही दिवसांपूर्वी बसचे उत्पादन करणाऱ्या काही कंपन्यांनी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी. मदान यांच्यासमोर संकरित बसेसचे सादरीकरण केले. त्यांनी इलेक्ट्रिकवर चालणारी किंवा डिझेलवरील तसेच दोन्ही प्रकारच्या बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
प्राधिकरणाच्या प्राथमिक नियोजनानुसार २५ आणि ४० सीटच्या बसेस वापरायचे ठरविले आहे. त्याचे तिकीट वाहकांकडून किंवा बसमध्ये तिकीट काढण्याचे यंत्र बसविले जाणार आहे. जानेवारीच्या मध्यावर त्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले.