जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या उज्ज्वला पाटील
By Admin | Updated: March 21, 2017 16:57 IST2017-03-21T16:57:53+5:302017-03-21T16:57:53+5:30
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या उज्ज्वला पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन यांची बहुमताने निवड

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या उज्ज्वला पाटील
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.21 - जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या उज्ज्वला पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन यांची बहुमताने निवड झाली. या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३७ मते मिळाली. भाजपाला काँग्रेसच्या चार सदस्यांनी पाठिंबा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री पाटील व शिवसेनेचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार गोपाल चौधरी यांना प्रत्येकी २७ मते मिळाली.
अध्यक्ष व उपाध्यपदासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात २१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सभा झाली. त्यात हात उंचावून ही निवड झाली.
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी पाटील, मीना पाटील व आत्माराम कोळी हे तीन सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांचे संख्याबळ १६ वरुन १३वर पोहचले. तर शिवसेनेचे १४ सदस्य एकसंघ राहिले. दोन्ही पक्षांना २७ पर्यंत मजल मारता आली. ६ सदस्य कमी पडल्याने त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले.
भाजपाने चौथ्यांदा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकविला आहे. आतापर्यंत तीन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत युती करीत सत्ता मिळविली होती. यावेळी मात्र भाजपाने स्वबळावर सत्ता मिळविली आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण ६७ जागांपैकी सर्वाधिक ३३ जागा भाजपाने पटकावल्या होत्या. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने १६, शिवसेनेने १४ तर काँग्रेसने ४ जागा मिळविल्या होत्या.