भाजपाच्या पापाला प्रायश्चित्त नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: November 13, 2014 09:31 IST2014-11-13T09:19:22+5:302014-11-13T09:31:17+5:30
भाजपाने आवाजी मतदानाने सभागृहात 'विश्वास' संपादन केला असला तरी त्यांच्या 'या' पापाला प्रायश्चित्त नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
भाजपाच्या पापाला प्रायश्चित्त नाही - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - भाजपाने आवाजी मतदानाने सभागृहात 'विश्वास' संपादन केला असला तरी जनतेच्या मनात भाजवाविषयी असलेला विश्वास उतरंडीला लागला आहे. जनतेच्या विश्वासाचा गळा घोटणा-या भाजपाच्या या पापाला प्रायश्चित्त नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
बुधवारी विधानसभेत भाजपाने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करुन घेतला होता. यावरुन उद्धव ठाकरेंनी सामनामधून भाजपावर जोरदार टीका केली. जनतेसाठी सरकार चालवू, स्वच्छ कारभार करु असे दावे भाजपाने निवडणुकीत केले होते. पण प्रत्यक्षात भाजपाचे हे सर्व दावे पोकळ व दांभिक असल्याचे विधानसभेतील घटनेवरुन स्पष्ट होते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सत्तेसाठी तडजोडी कराव्या लागतात मात्र यासाठी घटना, नियम, परंपरा यांचा गळा घोटला जात नाही असे त्यांनी भाजपाला सुनावले आहे. सभागृहातील परंपरा आणि प्रथा धाब्यावर बसवून सभागृहात विश्वास जिंकणारी मंडळी उद्या जनतेचा विश्वास कसा जिंकणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.