भाजपचा नागपूर पॅटर्न देशभर
By Admin | Updated: February 6, 2015 01:00 IST2015-02-06T01:00:05+5:302015-02-06T01:00:05+5:30
आठ कोटी सदस्यसंख्या असणारा चीनचा सत्ताधारी पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष आहे. येत्या वर्षात भाजपाची सदस्यसंख्या १० कोटी करून जगातला सर्वात मोठा पक्ष बनविणार,

भाजपचा नागपूर पॅटर्न देशभर
रावसाहेब दानवे : महाराष्ट्राला एक कोटीचे लक्ष्य
नागपूर : आठ कोटी सदस्यसंख्या असणारा चीनचा सत्ताधारी पक्ष जगात सर्वात मोठा पक्ष आहे. येत्या वर्षात भाजपाची सदस्यसंख्या १० कोटी करून जगातला सर्वात मोठा पक्ष बनविणार, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. यासाठी महाराष्ट्रात एक कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. गेल्या वर्षी नागपूरने देशात सर्वाधिक सदस्य नोंदणी केली होती. सदस्य नोंदणीचा नागपूर पॅटर्न भाजप देशभर राबवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर शहर, ग्रामीण भाजपा कार्यकर्ता मेळावा गुरुवारी शिक्षक सहकाही बँकेच्या सभागृहात झाला. या मेळाव्याला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, शहराध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधीर पारवे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, प्रदेश संघटक रवी भुसारी, महापालिकेचे पक्षनेते दयाशंकर तिवारी, स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर, जमाल सिद्दीकी, गिरीश व्यास, अर्चना डेहनकर, संध्या गोतमारे, अशोक मानकर, रमेश मानकर, संजय भेंडे आदी उपस्थित होते.
भाजपाच्या सदस्य नोंदणीत २०१३-१४ मध्ये देशात नागपूरने सर्वाधिक सदस्य नोंदणी करून पहिला क्रमांक पटकाविला होता. यावर्षीही हा मान नागपूर कायम ठेवेल, असा विश्वास कृष्णा खोपडे यांनी प्रदेशाध्यक्षांना दिला. नागपूरने राबविलेल्या सदस्य नोंदणीचा पॅटर्न देशभर राबविण्यासाठी नागपूरचा अभ्यास करण्यासाठी आलो असल्याचे दानवे म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा मी फाऊंडर मेंबर आहे. देशात भाजपाचे जेव्हा दोन खासदार निवडून आले होते तेव्हा आम्हाला डिवचले जात होते. कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्त्यांना मान मिळत नव्हता. राजकारणाचा काळ सारखा नसतो. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे काही वर्षांतच देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार बहुमतात आले.
यापुढेही हा देश काँग्रेसमुक्त करण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील. कार्यकर्ते उत्साहात आहेत, कामही जोरात करीत आहेत. फक्त नेत्यांनी त्यांना विश्वासात घेऊन काम करवून घ्यावे, असा सल्ला त्यांनी नेत्यांना दिला. (प्रतिनिधी)
नागपुरात सहा लाखाचे टार्गेट
देशात नागपूरने मिळविलेला मान कायम ठेवण्यासाठी शहर भाजपा प्रयत्नात आहे. नोव्हेंबरपासून सुरू झालेले सदस्य अभियानांतर्गत आजपर्यंत २,३५,००० सदस्य नोंदणी झाली आहे. शहरातील प्रत्येक बुथला ३०० नवीन सदस्य बनवायचे आहे. तर प्रत्येक आमदारांना ५० हजार सदस्य बनवायचे आहे. येणाऱ्या ३१ मार्चपर्यंत ६ लाख नवीन सदस्य नोंदणी करून पुन्हा नागपूरचा डंका देशभरात गाजवू, असा दावा क्रिष्णा खोपडे यांनी केला. जिल्ह्यातही ८४ हजार सदस्य झाले असून, आम्हीही ५ लाखाचे लक्ष्य गाठू असे डॉ. पोतदार यांनी सांगितले.