महापौरपदासाठी भाजपाच्या मुक्ता टिळक यांना पसंती ?
By Admin | Updated: March 6, 2017 02:09 IST2017-03-06T02:09:44+5:302017-03-06T02:09:44+5:30
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे.

महापौरपदासाठी भाजपाच्या मुक्ता टिळक यांना पसंती ?
पुणे : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. तर सभागृह नेतेपदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाचे निरीक्षक सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाची मते स्वतंत्रपणे जाणून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना त्याचा अहवाल सादर केला जाणार असून, त्यांच्याकडून नावांची अंतिम घोषणा होईल.
महापालिकेत भाजपाचे ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक रविवारी सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ उपस्थित होते. या बैठकीमध्ये नूतन नगरसेवकांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर गटनेता निवडीचे अधिकार मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले. त्याचबरोबर महापौर व उपमहापौरपदासाठी कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत सर्व नगरसेवकांचा स्वतंत्रपणे कौल जाणून घेण्यात आला. महापालिकेचे महापौर यंदा सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाले आहे. सत्तेवर आलेल्या भाजपाकडून ४८ नगरसेविका निवडून आल्या आहेत. महापौर पदासाठी महापालिकेच्या सभागृहामध्ये ८४ महिला उमेदवारांनी विजयश्री संपादन करून प्रवेश केला आहे. त्यामध्ये भाजपाकडून ४८ नगरसेविका निवडून आल्या आहेत, त्यापैकी महापौर पदासाठी माजी गटनेत्या मुक्ता टिळक, मानसी देशपांडे, रंजना टिळेकर, वर्षा तापकिर, रेश्मा भोसले, माधुरी सहस्त्रबुध्दे, मंजुश्री नागपुरे, निलिमा खाडे आदी नगरसेविकांची नावे चर्चेत होती. त्यापैकी चौथ्यांदा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सभागृह नेते पदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहे. (प्रतिनिधी)
।१५ मार्चला निवडणूक
महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक १५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. जिल्हाधकारी सौरभ राव या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यासाठी ८ मार्च रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्यापूर्वी पक्षाचा गटनेता व नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी नगरसेवकांची बैठक घेऊन ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
उपमहापौरपद रिपाइंकडे
भाजपाकडून उपमहापौरपद रिपाइंसाठी सोडण्याचा विचार करण्यात येत आहे. रिपाइंच्या उमेदवारांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या होत्या. रिपाइंला ५ जागा मिळालेल्या आहेत. महापालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त मिळाल्यानंतर भाजपाला महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष आदी महत्त्वाची सत्तास्थाने मिळणार आहेत. त्यामुळे उपमहापौर युतीमधील रिपाइंला देण्याचा विचार सुरू आहे.