भारिप-बमसंच्या बालेकिल्ल्यात भाजपची हॅट्ट्रिक!

By Admin | Updated: May 16, 2014 20:38 IST2014-05-16T18:49:44+5:302014-05-16T20:38:15+5:30

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी सलग तिसर्‍यांदा बाजी मारून भारिप-बहुजन महासंघाच्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकवली आहे.

BJP's hatrick in Bharip-bomb assembly | भारिप-बमसंच्या बालेकिल्ल्यात भाजपची हॅट्ट्रिक!

भारिप-बमसंच्या बालेकिल्ल्यात भाजपची हॅट्ट्रिक!

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी सलग तिसर्‍यांदा बाजी मारून भारिप-बहुजन महासंघाच्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकवली आहे. भाजप, काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाच्या तिरंगी लढतीत भाजपने गत निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्य घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकांवर या निकालाचे परिणाम कसे होतील, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातून भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर मैदानात होते. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून अकोला पॅटर्न सर्वदूर पोहोचवणार्‍या प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, अशी चर्चा निवडणुकीच्या सुरुवातीस होती. त्याअनुषंगाने भारिप-बमसं आणि काँग्रेसमध्ये चर्चाही झाली होती; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याची आशा मावळल्यानंतर आंबेडकरांनी यावेळी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोला पूर्व आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघ भारिप-बहुजन महासंघाच्या ताब्यात आहेत. याशिवाय जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवरही भारिप-बमसंचेच वर्चस्व आहे. आपल्या या राजकीय शक्तीच्या बळावर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचा पुरेपूर प्रयत्न आंबेडकरांनी केला. याशिवाय माळी आणि मुस्लीम मतं घेण्यासाठीही त्यांनी व्यूहरचना आखली होती; मात्र काँग्रेसने हिदायत पटेल यांच्या रूपाने सहकार क्षेत्राशी जवळीक असलेला अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मुस्लीम मतदारांवर विसंबून असलेल्या आंबेडकरांचा ताळमेळ बसला नाही.
हिदायत पटेल यांच्या उमेदवारीने सामाजिक समीकरणे बदलली. हिदायत पटेल यांच्यामुळे मुस्लीम मतं काँग्रेसच्या बाजूने एकवटल्या गेली. भारिप-बमसंला दलित मतांचे तर काँग्रेसला मुस्लीम मतांचे पाठबळ मिळाले. या तिरंगी लढतीत भाजपचे संजय धोत्रे मोदी लाटेवर स्वार झाले आणि तब्बल दीड लाखांपेक्षाही जास्त मताधिक्याने ते निवडून आले.
प्रारंभी निवडणुकीत तुल्यबळ लढत होईल, असा अंदाज होता; मात्र निकालानंतर ही लढत एकतर्फी असल्याचे सिद्ध झाले.
काँग्रेसने हिदायत पटेल यांची उमेदवारी उशिरा जाहीर केली. तरीही पटेल यांनी चांगली लढत देऊन, दुसरे स्थान मिळवले. भाजपने अकोला लोकसभा मतदारसंघात केवळ विजयच मिळवला नाही, तर प्रचंड मताधिक्यही मिळवले. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावच नव्हता; मात्र भारिप-बहुजन महासंघाचा बालेकिल्ला पुरता ढासळल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Web Title: BJP's hatrick in Bharip-bomb assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.