भाजपाचा हात सेनेने झिडकारला!
By Admin | Updated: October 7, 2014 05:58 IST2014-10-07T05:58:05+5:302014-10-07T05:58:05+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मी शिवसेनेवर टीका करणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसैनिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला

भाजपाचा हात सेनेने झिडकारला!
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मी शिवसेनेवर टीका करणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसैनिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून जोरदार प्रत्युत्तर देत भाजपाचा डाव उधळून लावला आहे.
महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न घेऊन भाजपावाले निवडणुकीत उतरले असून, शेठ-सावकारांचा सट्टाबाजारातील पैसा या स्वप्नपूर्तीसाठी वापरला जात आहे. त्यांचे स्वप्न महाराष्ट्राची शकले करण्याचे असताना या लोकांना शिवछत्रपतींचे आशीर्वाद लाभतील, असे ओरडून सांगणे हा हुतात्म्यांचा अवमान आहे. मोरारजी देसाई जे करायला धजावले नाहीत ते सर्व करण्याचा चंग भाजपा नेतृत्वाने बांधला आहे, अशी थेट टीका शिवसेनेने मुखपत्रातून मोदी यांच्यावर केली आहे.
शिवसेनाप्रमुखांनी गेली २५ वर्षे अभेद्य ठेवलेली युती या वेळीच कशी तुटली? केवळ जागावाटपावरून युती तुटत असताना शिवसेनाप्रमुखांबद्दलचा आदरभाव कुठे गेला होता? हा वाद ताणून न धरता युती अभेद्य ठेवली असती तर तीच शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली ठरली असती. तेव्हा आता श्रद्धांजली वगैरे म्हणणे म्हणजे ‘बूंद से गयी’ असे मराठी मनात आले तर? भाजपाच्या उत्सव मंडळाने एक लक्षात घेतले पाहिजे की, तुमच्याकडे शेठ-सावकारांचे बळ असेल, कारस्थाने व कटांचे बुद्धिबळ असेल, पाठीत खुपसण्यासाठी खंजीर असतील, पण शिवरायांचे आशीर्वाद इतके स्वस्त नाहीत. शिवाजी महाराज म्हणजे चालता बोलता पुरुषार्थ. हा पुरुषार्थ कुठून आणाल, असा हल्ला शिवसेनेने मुखपत्रातून भाजपावर केला. (विशेष प्रतिनिधी)