भाजपच्या गडात सेनेची पक्षबांधणी
By Admin | Updated: January 30, 2015 00:56 IST2015-01-30T00:56:49+5:302015-01-30T00:56:49+5:30
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्ष बांधणीसाठी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘मिशन विदर्भ’च्या

भाजपच्या गडात सेनेची पक्षबांधणी
विदर्भावर अधिक लक्ष : नेत्यांचे दौरै सुरू
नागपूर : भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्ष बांधणीसाठी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘मिशन विदर्भ’च्या माध्यमातून बालेकिल्ल्यात भाजपला शह देण्याचे सेनेचे प्रयत्न आहेत. यासाठी पक्षाचे सर्व प्रमुख नेते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
सेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस नागपूरमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना सूचना दिल्या. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले. या मुळे विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे. त्यापूर्वीच्या काळात या भागात भाजप प्रमाणेच सेनेचीही शक्ती होती. विशेषत: विदर्भात पश्चिम विदर्भ हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात होता तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातही सेनेचे आमदार निवडून येत होते. विधानसभा निवडणुकीत ऐन वेळी युती तुटल्याने सेनेची पिछेहाट झाली. निवडणुकीनंतर सेना सत्तेत सहभागी झाली असली तरी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर दोन्ही पक्षात मतभेद आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री विदर्भाचाच असल्याने भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सेनेची कोंडी होत आहे .पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विदर्भात पुन्हा जनाधार मिळविण्यासाठी शिवसेनेने‘शिवसंपर्क’ अभियानाच्या निमित्ताने ‘मिशन विदर्भ’ सुरू केले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख, मंत्री आणि आणि इतरही नेत्यांचे विदर्भात दौरे सुरू असून प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्ष बळकट करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. विशेष म्हणजे ही मोहीम फक्त विदर्भातच सुरू आहे. (प्रतिनिधी)
सध्या तरी स्वबळावर
प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्याची संधी मिळायला हवी. संघटना वाढीसाठी ही बाब गरजेची आहे. त्यामुळे पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सध्या तरी शिवसेनेचे धोरण स्वबळाचेच आहे, असे राऊत म्हणाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने व माजी आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते.
वैदर्भीयांना गृहीत धरू नका
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे संतापून विदर्भातील शेतकऱ्यांनी आघाडी सरकारच्या विरोधातील राग मतपेटीतून व्यक्त केला. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाले. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारला गांभीर्याने पाहावे लागेल. मुख्यमंत्री विदर्भाचेच असल्याने ते त्यांना न्याय देतील. विदर्भातील जनतेला गृहीत धरू नये असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत वाटपासंदर्भात ते बोलत होते.
अंतर्गत धुसफूस उघड
शिवसेनेच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. काही शिवसैनिकांनी पक्षात पूर्वाश्रमीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिल्याबद्दल नापसंती व्यक्त करीत पक्ष बळकट करण्यासाठी सक्षम जिल्हा प्रमुख निुयक्त करण्याची मागणी केली.