भाजपाच्या मद्यपी कार्यकर्त्याचा गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: October 7, 2014 08:51 IST2014-10-07T05:32:27+5:302014-10-07T08:51:09+5:30
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या एका मद्यपी युवकाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला

भाजपाच्या मद्यपी कार्यकर्त्याचा गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न
पुणे : भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या एका मद्यपी युवकाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गडकरींच्या भोवती असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्यास वेळीच रोखले आणि चांगलाच चोप दिला.
मद्यपी तरूणाचे नाव भरत कराड असून तो खासगी पेट्रोल पंपावर कामाला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील तो रहिवाशी आहे. गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकारानंतर येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भरत यास पोलिसांनी अटक केल्यानंतर सभा सुरळीत होऊन गडकरी पुढील सभेसाठी निघून गेले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गडकरी यांची सोमवारी सायंकाळी कोथरूड येथील शिक्षकनगर येथे सभा होती. गडकरी व्यासपीठावर जाताना, भरतने त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे तो गडकरींजवळ जाऊ शकला नाही. मात्र त्याने अचानक हातात बूट घेऊन तो गडकरींवर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्याला रोखले आणि त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोथरूड पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भरत याने गडकरींवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी असलेल्या पोलीस तसेच कार्यकर्त्यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. भरतने मद्यप्राशन केलेले होते. रात्री उशिरापर्यंत भरतची चौकशी सुरू होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)