भाजपा वर्षपूर्ती स्वबळावर करणार

By Admin | Updated: October 16, 2015 03:34 IST2015-10-16T03:34:29+5:302015-10-16T03:34:29+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

BJP will be on self rule for the year | भाजपा वर्षपूर्ती स्वबळावर करणार

भाजपा वर्षपूर्ती स्वबळावर करणार

यदु जोशी, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ‘नो सेलीब्रेशन, ओन्ली कम्युनिकेशन’ असे सूत्र ठरविण्यात आले असले तरी याबाबत शिवसेनेशी कसलेही ‘कम्युनिकेशन’ झालेले नाही. शिवसेनेला बाजूला ठेवूनच वर्षपूर्ती साजरी करण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली व पाकचे माजी विदेशमंत्री कसुरी यांच्या कार्यक्रमावरून भाजपा-शिवसेनेचे संबंध आधीच ताणले गेले असताना आता सरकारच्या वर्षपूर्ती समारंभापासून सेनेला दूर ठेवून भाजपाने आणखी एक खेळी केली आहे.
३१ आॅक्टोबरला सरकारचा शपथविधी झाला असला तरी केवळ भाजपाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांनी डिसेंबरमध्ये शपथ घेतली होती. त्याअर्थी ही फक्त भाजपा मंत्र्यांचीच वर्षपूर्ती आहे. मुंबई भाजपाच्या कार्यालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे आदींच्या उपस्थितीत पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक झाली. वर्षभरात आपण अनेक निर्णय घेतले ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री आणि दानवे यांनी केले.
भाजपाने वर्षपूर्ती स्वबळावर करण्याचे ठामपणे ठरविले असून त्यासाठी दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ११ नेत्यांची एक समिती आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. १९ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर आणि त्यानंतर दहा दिवस सरकारची कामगिरी जनमानसात पोहोचविण्यासाठी भाजपातर्फे जाहीर सभा, प्रत्येक गावातील निवडक लोकांशी संवाद, पत्रके, माहिती पुस्तकांचे वाटप, घरोघरी जावून निर्णयांची माहिती देणे, सर्व जिल्ह्णांच्या ठिकाणी पत्रपरिषदा असा धडाका लावला जाणार आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले की, वर्षपूर्तीनिमित्त केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता आमचे कार्यकर्ते संवादाचा व्यापक कार्यक्रम राबवतील. शासकीय योजनांचा अभ्यास असलेले पक्षाचे प्रशिक्षित कार्यकर्ते राज्यभर जातील.
>> सरकारने काय केले?
आपल्या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले पण ते अद्याप जनतेपर्यंत नीट पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे तुमच्या सरकारने काय काम केले, असे लोक आम्हाला विचारतात. असा सूर भाजपाच्या आमदारांनी आज पक्षाच्या बैठकीत लावला. संघटना आणि सरकार यांच्यात समन्वय हवा तसा दिसत नसल्याची तक्रारही अनेकांनी केली, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: BJP will be on self rule for the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.