भाजपाला देश मोडायचा आहे, काँग्रेसला तो वाचवायचा आहे

By Admin | Updated: February 6, 2016 01:50 IST2016-02-06T01:50:07+5:302016-02-06T01:50:07+5:30

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देश तोडायचा आहे, काँग्रेसला मात्र तो वाचवायचा आहे. गांधी परिवार आहे तोपर्यंत देशात आपला विचार रुजविता येणार नाही,

The BJP wants to make the country, the Congress has to save it | भाजपाला देश मोडायचा आहे, काँग्रेसला तो वाचवायचा आहे

भाजपाला देश मोडायचा आहे, काँग्रेसला तो वाचवायचा आहे

पुणे : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देश तोडायचा आहे, काँग्रेसला मात्र तो वाचवायचा आहे. गांधी परिवार आहे तोपर्यंत देशात आपला विचार रुजविता येणार नाही, याची त्यांना खात्री असल्यानेच ते गांधी परिवारावर टीका करतात, पण गांधी संपणार नाहीत, असे प्रतिपादन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरिंदरसिंग राजा ब्रार यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित पुणे, बारामती, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या युवक काँग्रेस विभागीय मेळाव्याला ब्रार यांनी मार्गदर्शन केले. भाजपा तसेच आरएसएस यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. काँग्रेस भवन येथे झालेल्या या मेळाव्याला युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी हिंमतसिंग, आमदार संग्राम थोपटे, अनंत गाडगीळ, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष विश्वजित कदम, उपाध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेसचे शहराध्ययक्ष अभय छाजेड आदी उपस्थित होते.
ब्रार म्हणाले, ‘‘भाजप ाआरएसएसच्या विचारांचे प्रतिनिधित्व करतो. आरएसएसला देशात भांडणे लावायची आहेत. हैदराबादच्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली, याचे कारण आरएसएसला विरोधी विचारांच्या लोकांना जगू द्यायचे नाही हेच आहे. ते सांगतील त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी वागतात. गांधी परिवारावर सतत शाब्दिक हल्ले केले जातात, याचे कारणही आरएसएसच आहे. मात्र गांधी परिवार या देशातील प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहे, तो अशाने संपणार नाही. ’’
विश्वजित कदम यांनी भाजपाचा पराभव युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस नेत्यांवरच्या हल्ल्याला यापुढे युवक काँग्रेसकडून तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विश्वास लांडगे, सचिन दुर्गाडे, प्रदीप कंद तसेच आमदार गाडगीळ, थोपटे, जोशी, छाजेड आदींची या वेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)

Web Title: The BJP wants to make the country, the Congress has to save it