‘सर्जिकल स्ट्राइक्स’चे भाजपने भांडवल करू नये - राधाकृष्ण विखे पाटील

By Admin | Updated: October 10, 2016 03:01 IST2016-10-10T03:01:56+5:302016-10-10T03:01:56+5:30

शेगाव येथील पत्रपरिषदेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप; सरकार म्हणजे केवळ ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’

BJP should not capitalize 'Surgical Strikes' - Radhakrishna Vikhe Patil | ‘सर्जिकल स्ट्राइक्स’चे भाजपने भांडवल करू नये - राधाकृष्ण विखे पाटील

‘सर्जिकल स्ट्राइक्स’चे भाजपने भांडवल करू नये - राधाकृष्ण विखे पाटील

शेगाव (जि. बुलडाणा), दि. ९- सर्जिकल स्ट्राइक्स करण्यापूर्वी भारतीय सैन्याने नियोजन केले होते. त्यामुळे ते कशासाठी खोटे बोलतील? आपण त्यांच्यावर विश्‍वास ठेवायला हवा. हा मामला सैन्य, देश आणि नागरिक यांच्याशी संबंधित आहे. मात्र, या विषयाचे भांडवल भारतीय जनता पक्ष करीत असल्याचा आरोप, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी येथे केला.
काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी शेगावात आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की राज्यातील भाजप-शिवसेनेच्या शासनाची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, या सरकारपासून समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. त्यामुळे हे सरकार म्हणजे केवळ ह्यइव्हेंट मॅनेजमेंट कंपनीह्ण बनली आहे.
महाराष्ट्रात २३३ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद व १0 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात येत आहे. या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसला जिंकता याव्या, यासाठी स्वराज्य संकल्प अभियानास आजपासून प्रारंभ करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नऊ नगर परिषदेच्या प्रचाराचा शुभारंभही या निमित्ताने होत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेच्या प्रस्तावनेत सांगितले. जनतेला राज्य शासनाकडून खूप अपेक्षा होत्या; मात्र हे शासन सर्वच आघाड्यांवर पूर्णत: अपयशी ठरले आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्‍वासने या सरकारने पाळलेली नसल्याने हे शासन केवळ जनतेची लूट करीत असल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेची झाली आहे.
कापसाला सहा हजार रुपये भाव देण्याचे आश्‍वासन पूर्ण केले नाही. येणार्‍या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले. अनेक बाबतीत न्यायालय या शासनाला फटकारत आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतरच या शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. यवतमाळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांने दुष्काळ जाहीर करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेतकरी आत्महत्या थांबत नसून, सरकारने जनमानसाचा विश्‍वास गमावल्याचे ते म्हणाले. आम्ही शासनातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतो; परंतु मुख्यमंत्री फडणवीस त्यांना क्लीन चिट देतात. कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
भगवान गडावरील वादात मी पडणार नसल्याचे सांगून, गडाचे पावित्र्य राखले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकार मराठा, धनगर, मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी विलंब करून, या समाजाच्या जनतेची उपेक्षा करीत आहे. ज्या ठिकाणी अतवृष्टी झाली, त्यांना मदत देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवून शेतकर्‍यांना मदत दिल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा निश्‍चयही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दोन वर्षाच्या या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी कोणत्याही जनोपयोगी योजना राबविल्या नसून, सामजिक तेढ निर्माण करण्याचे एकमेव कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले. येणार्‍या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत जनतेच्या न्यायालयात त्याचा फैसला होणार असल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस अँड. गणेश पाटील, श्याम उमाळकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते रामविजय बुरूंगले, अंजली टापरे यांची उपस्थिती होती.

नाशिकच्या घटनेबाबत शांततेचे आवाहन
शनिवारी नाशिक येथे पाच वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने केलेल्या पाशवी अत्याचारामुळे नाशिकसह परिसरातील जनता रस्त्यावर आली आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. येत्या १५ दिवसांत या प्रकरणाची चार्जशिट न्यायालयात दाखल करणार असल्याचे आश्‍वासन सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: BJP should not capitalize 'Surgical Strikes' - Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.