ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - देशात व राज्यातील सत्तेत एकमेकांचे सहकारी असलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील कुरबुरी अद्यापही संपलेल्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या तरी मुद्यावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
(भाजपाचं सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य - संजय राऊत)
केंद्रात निजामाच्या बापाचं राज्य अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केलेली टीका भाजपाला रुचली नाही. त्यावर ' इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण स्वत: औरंगजेबासारखे वागत आहोत का याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे ' असा प्रतिटोला भाजपाने शिवसेनेला हाणला. मात्र या मुद्यावरून सुरू झालेले युद्ध अजूनही संपलेले नसून आता भाजपाने पुन्हा 'पोस्टर'च्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना बेडकाची उपमाही देण्यात आली आहे.
' देश "पिताश्रीं"च्या पुण्याईवर आणि "मातोश्री"च्या आशीर्वादाने नाही चालत… त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा "सामना" करावा लागतो…' असा आशय लिहीलेलं एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालं असून त्याखाली ‘i support NaMo!’ असेही लिहीण्यात आले आहे. तर दुस-या एका पोस्टरमध्ये 'पावसाळा आला की असे बेडूक डराव डराव करणारच....' असे लिहीण्यात आले असून त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बेडकाची उपमा दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सेना-भाजपामधील वाद वाढताना दिसत आहेत.
सेना-भाजपात यापूर्वीही रंगले होते पोस्टर युद्ध
यापूर्वीही शिवसेना-भाजपादरम्यान अनेक वेळेस असे पोस्टरयुद्ध रंगले होते. गेल्या महिन्यातच शिवसेना नेत्यांनी भाजपाचे मंत्री प्रकाश मेहता यांच्या घाटकोपर पूर्व मतदारसंघात पोस्टर लावून त्यांच्यावर निशाणा साधला होता.'मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल' असे वक्तव्य प्रकाश मेहतांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये शिवसेनेने प्रकाश मेहता यांची तुलना माजलेल्या बोक्याशी केली होती.
'माजलेला हा बोका स्वत:ला सिंह समजतो काय? या नकली सिंहाचा बुरखा आता फाडावाच लागेल' असे या पोस्टवर लिहीले व मेहता यांना बोक्याच्या रुपात दाखवण्यात आले.. घाटकोपरमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ही पोस्टर्स लावत मेहतांना चांगलाच दणका देत मुंबईत शिवसेनाच खरा वाघ असल्याचे ठसवण्याचाही प्रयत्न केला.
तर ऑक्टोबर २०१५ मध्ये शिवसेना भवनाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे नतमस्तक झाले असे एक पोस्टर झळकल्याने वाद निर्माण झाला होता.
पोस्टरवरील छायाचित्रांपेक्षा त्यावरील मजकूर खास शिवसेना शैलीतील शालजोडा होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे नतमस्तक झालेल्या मोदींच्या छायाचित्राच्या बाजूला ठळक अक्षरात लिहिले होते, ‘विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी, झुकल्या होत्या त्यांच्या गर्विष्ठ माना, साहेबांच्या चरणी! फक्त बाळासाहेब. अटलबिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे बाळासाहेबांसोबतचे फोटो या पोस्टरवर लावण्यात आले होते. जे भाजपा नेते एकेकाळी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होत असत, तेच नेते आता मागील दिवस विसरले असल्याची टीका सेनेने पोस्टरद्वारे केली होती. शिवसेना आणि बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्रात भाजपाचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असली तरी राज्यात आपणच मोठा भाऊ आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्नही शिवसेनेने केला होता. मात्र सेनेच्या या कृतीमुळे राज्यातील वातावरण तापू लागले आणि भाजपानेही शिवसेनेच्या कृत्याचा विरोध केला होता.
Web Title: BJP-Shiv Sena reshuffle posterworld
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.