भाजपाचे साबळे राज्यसभेवर बिनविरोध
By Admin | Updated: March 11, 2015 02:39 IST2015-03-11T02:39:05+5:302015-03-11T02:39:05+5:30
राज्यसभेच्या एका जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुक असताना पिंपरी चिंचवड येथील भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष

भाजपाचे साबळे राज्यसभेवर बिनविरोध
मुंबई : राज्यसभेच्या एका जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुक असताना पिंपरी चिंचवड येथील भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अमर शंकर साबळे यांची अनपेक्षितपणे वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. साबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत मुरली देवरा यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी भाजपाकडून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, मुंबईतील नेत्या शायना एन.सी. यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, अशी चर्चा होती; पण अचानक साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
साबळे हे पूर्वीपासून ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. २००९मध्ये ते स्वत: पिंपरीमधून (जि. पुणे) विधानसभेची निवडणूक लढले, पण त्यांना हार पत्करावी लागली होती. २००४च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरीची जागा भाजपाने रिपाइंसाठी सोडल्याने साबळे यांनी निवडणूक लढविली नव्हती. आता राज्यसभेचे तिकीट देऊन पक्षाने त्याची भरपाई केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. साबळे यांना आजच उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. या जागेसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)