Radhakrishna Vikhe Patil News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना मोठा धक्का बसला. यानंतर विरोधकांनी दारूण पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निश्चय बोलून दाखवला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाला इतके दिवस होऊन गेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर भाष्य करताना संशय व्यक्त केला.
राज ठाकरे यांच्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. वरळीत मनसैनिकांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ठाकरे म्हणाले की, विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असे राज ठाकरे म्हणाले. यावर आता भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबाबत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले.
बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर
गेल्या सात निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होत आलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात १० हजार मतांनी पराभूत कसे झाले, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणे म्हणजे, त्या भागातील मतदारांचा अपमान करण्यासारखे आहे. हे त्या मतदारसंघातील जनता सहन करणार नाही.
दरम्यान, तालुक्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्यांचे कुठलेही स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. तहसील कार्यालय झाल्यानंतर तालुक्याचे विभाग होतील, असा समज निर्माण केला जात आहे. असे काही होणार नाही. कुठलीही स्वातंत्र्याची लढाई कोणाला लढण्याची आवश्यकता नाही. विधानसभा निवडणुकीनंतर लोक पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता लगावला.