भाजपाध्यक्ष अमित शहांचा मुंबई दौरा रद्द
By Admin | Updated: September 25, 2014 10:06 IST2014-09-25T09:44:17+5:302014-09-25T10:06:36+5:30
महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाला आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहांचा मुंबई दौरा रद्द
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाला आहे. महायुती टिकेल याविषयी केंद्रीय नेतृत्वाला साशंकता वाटू लागल्याने अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून महायुती संपुष्टात येणार या चर्चेचाली उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी अवघ्या २० दिवसांचा कालावधी उरलेला असतानाच महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना - भाजप नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुती अभेद्यच राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र युती टिकवण्याच्या नादात शिवसेना - भाजपने महायुतीतील लहान पक्षांचा बळी देण्याचे प्रयत्न सुरु केले. घटकपक्षांच्या जागा कमी करुन भाजपला जागा वाढवून देण्यात आल्या. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना, शिवसंग्राम संघटना या लहान पक्षांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला.
घटक पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना - भाजपने बुधवारी रात्री उशीरापर्यंत प्रयत्न केले. मात्र यातही अपेक्षीत तोडगा निघू शकला नाही व महायुतीतील तणाव कायम राहिला. गुरुवारी भाजपाध्यक्ष अमित शहा हे मुंबई दौ-यावर येणार होते. मात्र हा दौरा गुरुवारी सकाळी अचानक रद्द करण्यात आला असून दौरा रद्द का झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेसोबत युती टिकेल याविषयी शंका वाटत असून दौरा रद्द होण्यामागेही हेच कारण असावे असे समजते. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेनेनेही कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिल्याची माहिती स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहुर्तावर महायुतीचा घटस्फोट होईल अशी चर्चा जोर धरु लागली आहे.