भाजपात कुणी गद्दार नाही!
By Admin | Updated: July 4, 2016 04:36 IST2016-07-04T04:36:08+5:302016-07-04T04:36:08+5:30
भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.

भाजपात कुणी गद्दार नाही!
जळगाव : भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
विशेष म्हणजे खा. रक्षा खडसे, आ. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीतच महाजन यांनी हे मत मांडले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जळगावातच आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना, माझ्यावर जे आरोप झाले तो कटाचा एक भाग आहे. पक्षातील गद्दारांचा आधी बंदोबस्त करा, असे विधान केले होते. त्याबाबत छेडले असता महाजन म्हणाले की, पक्षात गद्दार असल्याचे मला वाटत नाही.
मी मोठा नेता नाही
खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आपण महिनाभर गप्प का होते? यावर महाजन म्हणाले, खडसेंवरील आरोपांबाबत खुद्द खडसे त्यांच्या मागणीनुसार चौकशी सुरु असून लवकरच ती पूर्ण होईल व ते अग्निदिव्यातून तावून सलाखून बाहेर पडतील. आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. मी त्यांच्यापेक्षा मोठा नेता नाही. त्यामुळे खुलासा करण्याचा प्रश्नच येत नाही.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जळगावला तापी महामंडळात विचारलेली माहिती त्यांना तोंडी स्वरुपात देण्यात आली. त्यांना कोणतीही कागदपत्रे दिलेली नाही. ती त्यांना हवी असल्यास त्यांनी माहितीचा अधिकार वापरावा, असेही महाजन म्हणाले. (प्रतिनिधी)
>खडसे-महाजन एकाच व्यासपीठावर
जळगावच्या जिल्हा बँक सभागृहात रविवारी राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात एकनाथ खडसे, गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते, परंतु आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. आरोपांबाबत कुणी पुरावेही दिले नाही. त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी खंत खडसे यांनी मेळाव्यात व्यक्त केली.
दमणगंगा-पिंजाळचे पाणी मुंबईला
दमणगंगा-पिंजाळचे वाहून जाणारे पाणी मुंबईसाठी वळविण्यात येऊन मुंबईकरांची तहान भागविण्यात येईल. तसेच तापी-नर्मदाचे वाया जाणारे पाणीही गुजरातच्या सिमेवरुन उचलण्याचा प्रयत्न आहे. अन्यथा या पाण्याच्या बदल्यात गुजरातने महाराष्ट्राला पाणी द्यावे, अशीही आपली मागणी आहे.