MP Udayanraje Bhosale on Nitesh Rane: मंत्री नितेश राणे यांच्या विविध वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. नुकतेच छत्रपती शिवाजी महारांच्या इतिहासाबाबत नितेश राणेंनी मोठा दावा केला होता. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असं नितेश राणेंनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून जोरदार टीका देखील करण्यात आली. त्यानंतर आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री नितेश राणे यांचा दावा खोडून काढला आहे. नितेश राणे भावनेच्या भरात बोलले असल्याचे उदयनराजेंनी म्हटलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले होते. त्यानंतर शिवजयंतीच्या निमित्ताने बोलताना पुन्हा नितेश राणे यांनी, आमच्या राजाला धर्मनिरपेक्ष राजा बनवण्याचा डाव काही लोक करत आहेत, आम्हाला हे यशस्वी होऊ द्यायचे नाही, अनेक पुरावे असूनही काही लोक विनाकारण चार-पाच मुस्लिमांची नावे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात वेगवेगळ्या पदांवर मुस्लिम सैनिक कार्यरत होते, असे सांगतात. पण प्रत्यक्षात आमच्या राजाच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता. हे मी तुम्हाला ठामपणे सांगत आहे. संधी मिळाल्यास पुराव्यासह विधानसभेत मांडेन, असं म्हटलं.
त्यानंतर आता पत्रकार परिषदेत बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी नितेश राणेंच्या दाव्यावर भाष्य केलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण फौज किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. मुस्लीम, हिंदू आणि इतर समाजातील लोकही होते. असं काही नाही की फक्त मराठा समाजातील लोक होते. मुस्लीम समाजातील लोकही होते आणि ते जबाबदारीच्या पदावर होते," असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.
"मला वाटतं नितेश राणेंनी भावनेच्या आहारी जाऊन असं वक्तव्य केलं असावं. कारण ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल केले गेले. स्वाभाविक आहे आपण या रागापोटी एखादं मत व्यक्त करतो," असंही उदयनराजेंनी म्हटलं.
काय म्हणाले होते नितेश राणे?
"आमच्यातले काही टाळके सांगतात, शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते, हे उगाच टेपरेकॉर्डर चालवतात, स्वराज्याची लढाई हे इस्लाविरोधात होती. हिंदू-मुस्लिम लढाई होती. या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्म इस्लामसमोर झुकू दिला नाही, हा इतिहास आहे" असं नितेश राणेंनी म्हटलं होतं.