भाजपा-मनसे युती संपुष्टात
By Admin | Updated: September 10, 2014 03:03 IST2014-09-10T03:03:42+5:302014-09-10T03:03:42+5:30
अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेची साथ सोडून मनसेशी घरोबा करणा-या भाजपाने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला झटका दिला आहे

भाजपा-मनसे युती संपुष्टात
नाशिक : अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेची साथ सोडून मनसेशी घरोबा करणाऱ्या भाजपाने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला झटका दिला आहे. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन आणि भाजपाचे उत्तर महाराष्ट्र महापालिका आघाडीचे अध्यक्ष विजय साने यांनी त्याची अधिकृत घोषणा केली.
भाजपाने चूक सुधारल्याबद्दल शिवसेनेने समाधान व्यक्त केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक ४० उमेदवार निवडून आले, परंतु बहुमत नसल्याने जनतेचा कौल मनसेच्या बाजूने असल्याचे सांगत भाजपाने सेनेशी युती तोडून मनसेला साथ दिली. मनसेचा महापौर आणि भाजपाचा उपमहापौर असे समीकरण होते.
मात्र काही महिन्यांपासून मनसे-भाजपात खटके उडू लागले. त्यातच स्थायी समिती सभापतिपदासाठी मनसेने शब्द पाळला नाही, हे निमित्त झाले. यंदा महापौरपद भाजपालाच हवे, असा हेका धरून स्थानिक भाजपा नेत्यांनी मुंबईत राज ठाकरेंशी चर्चाही केली होती. मात्र ऐववेळी भाजपाने वेगळा निर्णय घेतला.
महापौरपदासाठी शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी तर भाजपाने उपमहापौरपदासाठी एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. मनसेसह अन्य पक्षांचा उमेदवारीबाबत थेट निर्णय न झाल्याने एकापेक्षा अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)