उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 07:46 PM2023-08-02T19:46:25+5:302023-08-02T19:46:44+5:30

मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, लँड-जिहाद मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला

BJP Mla prasad lad demands anti Love Jihad law to be introduced in Maharashtra just like Uttar Pradesh | उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी

उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी

googlenewsNext

BJP Prasad Lad, Love Jihad Issue: गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात लव्ह जिहाद हा मुद्दा चर्चेत आहे. या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काही चित्रपटही आले आहेत. त्यावरून अपेक्षित वाद झालाच. पण आता उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात कडक कायदा करावा, मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, त्याचप्रमाणे लँड जिहाद सारख्या विषयांचा देखील गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाने दाखल केलेल्या 260 च्या प्रस्तावावर बोलत असताना आमदार लाड यांनी ही मागणी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. परंतु उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा करावा, असे मत लाड यांनी सभागृहात व्यक्त केले. राज्यातील लव्ह जिहादच्या अनेक प्रकरणात कशाप्रकारे हिंदू मुलींना फूस लावली जात आहे. लँड जिहादची प्रकरणे घडत आहेत, याबाबत सभागृहात त्यांनी माहिती दिली.

सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे. आणि या नुसारच मागील एका वर्षाच्या काळात महाराष्ट्र सरकार काम करत असून, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृह विभागाचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी लाड यांनी एका वृत्तपत्राचा हवाला देताना सांगितले की, मागील 3 वर्षात देशातून 13 लाख पेक्षा अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्या असून, लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे गावातील अल्पवयीन मुलींच्या फसवणूक प्रकरणाचा उल्लेख देखील लाड यांनी यावेळी सभागृहात केला. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणात टेरर फंडींग होत असून, उंबरे गावातील प्रकरणाची एक सीडी सभापतींना देणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी दिली.

मागील वर्षभरात काढण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोशाला न्याय मिळावा तसेच हिंदू, बौद्ध, शीख, सिंधी मुलींना लवकर न्याय मिळेल, यासाठी लव्ह जिहादसारख्या कायद्यांची नितांत गरज आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणात फसवणुकीतून विवाह आणि त्या काळात होणारे धर्मांतरण हा विषय गांभीर्याचा आहे. विविध मोर्च्याच्या माध्यमातून जनतेच्या भावना पुढे आलेल्या आहेत. केरळसारख्या राज्यात देखील या विषयाला गांभीर्याने घेतले आहे. १४ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींना फसवून असे प्रकार घडत आहेत. अशा प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय देखील आहे, असे स्पष्ट मत यावेळी आमदार लाड यांनी मांडले.

मुंबईसारख्या शहरांमध्ये जिकडे झोपडपट्टीचा भाग आहे. धारावी, मालवणीसारख्या झोपडपट्टी भागात हे प्रकार घडत आहेत. तेथील मुलींना आमिष दाखवून फसवल जात आहे आणि लव्ह जिहादची प्रकरणे घडत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असून, हिंदू समाजातील मुलींवर होणारा हा अन्याय रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे. इतर राज्यांनी केलेल्या कायद्यांची माहिती मागवली जावी आणि आपल्या राज्यात अशा प्रकारचा कडक कायदा केला पाहिजे व त्यात योग्य त्या तरतुदी केल्या पाहिजेत. उत्तरप्रदेशच्या कायद्याचा अभ्यास करून, मग त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. येत्या काळात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कडक कायदा व्हावा, ही जनतेची सुद्धा तीव्र इच्छा असल्याच्या भावना आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केल्या.

त्याचप्रमाणे मशिदीवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर ध्वनीक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा विषय देखील आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी सभागृहात उपस्थित केला. राज्यात सातत्याने मागणी झाली की मशिदीवरचे भोंगे काढले जावेत, सुप्रीम कोर्टाचे देखील याबाबत निर्देश आहेत. याबाबत राज्य सरकारकडे कुठलीही नियमावली नसून, सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. व याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

समोर भोंगे लागले आणि आम्ही हनुमान चालिसा म्हणालो तर त्यावर विषय वाढवला जातो, असे स्पष्ट मत आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत बोलताना व्यक्त केले आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेते, हे पहावे लागेल.

Web Title: BJP Mla prasad lad demands anti Love Jihad law to be introduced in Maharashtra just like Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.