कल्याण - उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे भाजपाचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड हे जेलमध्ये केवळ नावापुरते आहेत. ते हफ्त्यातून, १५ दिवसातून चेकअपच्या नावाखाली जे जे हॉस्पिटलला जातात, तिथून पूर्ण मुंबई फिरतात आणि पनवेलमधील एका आमदाराच्या फार्महाऊसवर जाऊन एन्जॉय करतात. त्यानंतर रात्री १० वाजता जेलमध्ये जातात असा धक्कादायक आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महेश गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गणपत गायकवाड जेलमधून कल्याणमधील व्यापाऱ्यांना फोन करतात. सतत कल्याण पूर्वेतील व्यापाऱ्यांना गणपत गायकवाडांचे फोन असतात ते कुठून येतात? इतर आरोपींना वेगळा न्याय आणि भाजपा पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय हे सिद्ध झालं आहे. माझ्यावर गोळीबार करणारे फरार आरोपी अजून पोलिसांना सापडत नाही. मी अनेक वेळा त्यांचे पत्ते सांगितले. दहागाव फार्महाऊसला काही लपले होते. त्यानंतर लोणावळा फार्महाऊसला लपले होते. पोलिसांना माहिती देऊनही अटक होत नाही असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय फरार आरोपींचे पोस्टर्स मी लावणार असून जे कुणी या आरोपींची माहिती देतील त्यांना २५ हजार प्रत्येकी बक्षीस जाहीर केले आहे. एकूण ३ आरोपींना जामीन मिळाला आहे. साताऱ्यातील एक न्यायाधीश होते, त्यांना ५ लाखांची लाच घेताना पकडले. न्यायाधीशांकडेही संशयाच्या पाहायला लागते. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाल्यानंतरही अशा लोकांना जामीन मिळतो. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात वेगळा न्याय आहे. आज वैभव गायकवाड कल्याण भाजपा युवा नेता म्हणून आहे अजून त्याला पदावरून काढले नाही. मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई नाही. सरकारी वकील मागितले तेदेखील दिले नाहीत असा आरोप महेश गायकवाड यांनी केला.
दरम्यान, मी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव असल्याने ते हाताश असल्याचं दिसून येते. कल्याणमध्ये एका मुलीवर बलात्कार करून हत्या झाली त्याचे संबंधही भाजपा पदाधिकाऱ्यांशी आहेत. त्यालाही जेलमध्ये बिर्याणी खायला घातली जाते. व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जातेय असंही महेश गायकवाड यांनी सांगितले.