BJP Leader Eknath Khadse Reaction on expansion of Cabinet expansion | सत्ता आली की सत्तेचे गुण अन् अवगुण लागतात; मंत्रिमंडळ विस्तारावर खडसेंची खदखद
सत्ता आली की सत्तेचे गुण अन् अवगुण लागतात; मंत्रिमंडळ विस्तारावर खडसेंची खदखद

नवी दिल्ली - विरोधी पक्षातून भाजपात प्रवेश  करुन मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांबद्दल भाष्य करताना एकनाथ खडसेंनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. आमच्याकडे चार-पाच वेळा निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही. स्वाभाविक ते नाराज होतात. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. पक्ष हितासाठी, पक्ष वाढीसाठी काही निर्णय घेतले जातात. सत्ता आली की सत्तेचे गुण आणि अवगुण लागत असतात अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. 

अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना संधी मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष होतं. मात्र पुन्हा एकदा खडसेंना डावलण्यात आल्याचं बोललं जातं. खडसे सध्या दिल्लीत असल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात जाण्याचा उत्साह राहिला नाही. विखे पाटील यांच्या घराण्याचा राजकीय इतिहास आहे. काँग्रेस, शिवसेना आता भाजपामध्ये येत त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही. सत्तेसाठी पक्ष बदलणं माझ्या स्वभावात नाही. विरोधात असताना अनेक ऑफर आल्या. तुमचा पक्ष सत्तेत कधीच येणार नाही असं सांगितलं गेलं मात्र आज आम्ही सत्तेत आलो असल्याचं खडसेंनी सांगितले. 

दरम्यान गेली 40 वर्षे पक्षवाढीसाठी आम्ही मेहनत घेतले. इतके वर्ष पक्षासाठी झटलो आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही. पक्षाची जमीन भुसभुशीत करण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे खडसे असले काय नसले काय त्याने काही फरक पडत नाही. भुसभुशीत जमिनीवर कोणतंही पिक घेतलं तरी ते येणारच आहे असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी लगावला आहे. तसेच पक्षात अडवाणींबद्दल जे झाले ते वाईट आहे. पक्षाच्या वाढीसाठी सध्या भाजपाला इतर पक्षातील नेत्यांची गरज आहे. पक्षवाढीसाठी अशा लोकांना पक्षात घेऊन मंत्री केलं जातं असंही खडसेंनी सांगितले.  


Web Title: BJP Leader Eknath Khadse Reaction on expansion of Cabinet expansion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.