आरक्षण संपविण्याचे भाजपा सरकारचे प्रयत्न
By Admin | Updated: October 24, 2015 01:46 IST2015-10-24T01:45:15+5:302015-10-24T01:46:17+5:30
अकोला येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवात प्रकाश आंबेडकरांची भाजप, संघावर टीका.

आरक्षण संपविण्याचे भाजपा सरकारचे प्रयत्न
अकोला: देशामध्ये सत्तांतर झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप, भाजप त्यांचे विचार देशावर लादण्याचा प्रयत्न करताहेत. हे विचार देशविरोधी आहे. घटना बदलविण्याचे त्यांचे प्रयत्न असून, आता तर हिंदू ओबीसींच्या आरक्षणालाच त्यांनी विरोध सुरू केला आहे. २0१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत संघाला ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणायचं आहे आणि नंतर अनुसूचित जाती, जमातींच्या आरक्षणावर घाला घालायचा आहे. हे आरक्षण कायम ठेवायच असेल, तर धर्मांध शक्तींविरुद्ध संघर्ष करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित ३0 व्या धम्मचक्र प्र्वतन दिन महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अँड. आंबेडकर पुढे म्हणाले, घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद आहे; परंतु तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांना घटनादुरुस्तीची संधी न मिळाल्याने त्यांनी मंडल कमिशन नेमलं आणि ओबीसींना आरक्षण दिलं. याचदरम्यान रथयात्रा काढून भाजपने धर्माचं राजकारण केलं. आता संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाचे समीक्षण करण्याबाबत त्यांचे मत व्यक्त केले. हे समीक्षण आधी ओबीसींच होईल, हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. भाजप सरकार संघाला बांधील आहे. एकूणच ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येईल, असा प्रयत्न संघ, भाजपकडून होत असल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी यावेळी केला. ओबीसींचं आरक्षण संपविल्यानंतर अनुसूचित जाती, जमातीचं आरक्षण संपवायचं, असे षड्यंत्र संघाने रचले आहे. २0१९ पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत घटनाच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला त्यांचे अधिकार कायम ठेवायचे असतील, तर संघर्षासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे. ज्यांना आरक्षण मिळालं त्यांनी ते वाचविण्यासाठी वाहक बनण्याची गरज निर्माण झाली आहे, असे अँड. आंबेडकर म्हणाले.