भाजपाचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: November 14, 2014 09:41 IST2014-11-14T09:29:57+5:302014-11-14T09:41:08+5:30
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणारे भाजपाचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
भाजपाचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणारे भाजपाचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. भाजपाने आवाज वाढवून ठराव जिंकला असला तरी त्यांचे नैतिकतेचे सोवळे सुटल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला मनोरुग्णालयात नेण्याची वेळ राष्ट्रवादीमुळेच आली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये शरद पवारांच्या फुल पॅण्टची हाफ चड्डी झाली आणि भाजपाच्या डोक्यावरही चांद - ता-यांची टोपी आली असा सणसणीत टोलाही त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाला लगावला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत जे झाले त्याचा राज्यभरात धिक्कार होत असून संस्था किंवा त्याच्या पद्धतीपासून दूर गेल्यास जनताच धडा शिकवेल असा इशाराच त्यांनी भाजपाला दिला आहे.
राज्यपालांना दुखापत झाल्याचे भाजपाने म्हटले असले तरी राज्यपाल चालत विधीभवनात आले व तिथे जोरदार भाषण ठोकले. पण भाजपाने खोटा 'पुरावा' देऊन काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन केले असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला.