गुहागरात भाजपकडून एकाकीच लढत?

By Admin | Updated: October 7, 2014 23:50 IST2014-10-07T22:11:37+5:302014-10-07T23:50:08+5:30

गुहागरचे रण : एकही केंद्र, राज्यस्तरीय नेता फिरकला नाही, चुरशीच्या सामन्याकडे पक्षाकडूनच दुर्लक्ष

BJP fighting alone in Guhagar? | गुहागरात भाजपकडून एकाकीच लढत?

गुहागरात भाजपकडून एकाकीच लढत?

रत्नागिरी : प्रत्येक उमेदवार प्रचारात गुंतलेला आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेतेमंडळी जिल्ह्यात आली असताना गुहागर विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये मात्र कमालीची शांतता आहे. एकही वरिष्ठ नेता गुहागर मतदारसंघाकडे न फिरकल्याने नातूंच्या पराभवासाठी भाजपनेच रणनीती आखली की काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
प्रचारासाठी असलेला कमी कालावधी, युती अन् आघाडी तुटल्याने प्रत्येकाला सुरूवातीपासून करावा लागणारा प्रचार यामुळे साऱ्याच उमेदवारांची गडबड उडाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाकडून राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. मात्र, दुसरीकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ मानलेल्या गुहागर मतदारसंघात भाजपमध्ये शांतता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यात सरळ लढत होणार आहे. नातू यांनी यापूर्वी तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. चौथ्या वेळेला मतदारसंघ पुनर्रचनेमुळे मतदारसंघ कमी झाले आणि गुहागर-चिपळूण मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. या मतदारसंघातून रामदास कदम यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या विनय नातू यांनी बंड करून अपक्ष अर्ज भरला. मात्र, या वादात नातू आणि कदम या दोघांचाही पराभव होऊन भास्कर जाधव हे निवडून आले. त्यानंतर गेल्या वर्षी नातू यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेशही मिळाला.
या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार होता. त्यामुळे याठिकाणी विनय नातू यांनाच उमेदवारी मिळणार हे सरळ होते आणि त्यांना उमेदवारी मिळालीही. मात्र, त्याचवेळी युतीचीही ताटातूट झाली. त्यामुळे आता विनय नातू यांची वाट याही निवडणुकीत बिकट झाली आहे. आतापर्यंत एकही नेता या मतदारसंघाकडे फिरकलेलाही नाही.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या मतदारसंघात प्रचारसभा घेणार, असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते एकत्र जमले. मात्र, त्यादिवशी रत्नागिरीतील सभा आटोपून गडकरी हे परस्पर दिल्लीदरबारी रवाना झाले. त्यांचा दौरा रद्द होण्याचे कारण ‘दाट धुके असले’ तरीही ‘गुहागरवर दाटलेले दाट धुके’ हे खूप काही सांगून जाणारे असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे त्यादिवशी गडकरी राहोच, पण जिल्हास्तरीय नेताही नातू यांच्या प्रचारसभेकडे फिरकलेला नाही. गोव्याचे खासदार नरेंद्र सांगवीकर वगळता अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही सभा चालवली. त्यामुळे नातू यांना पक्षातूनच विरोध होत आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. गुहागर मतदारसंघात विनय नातू यांच्या रूपाने भाजपने तगडा उमेदवार दिला असला तरी त्यांच्या ठरलेल्या दौऱ्याकडे गडकरी यांनी पाठ फिरवणे व त्याची भाजपच्या अंतर्गत गोटात वेगळ््या पध्दतीने चर्चा होणे हा विषय साऱ्यांसाठी तितकाच उत्कंठेचा ठरणार आहे. (प्रतिनिधी)

सर्वाधिक चर्चेतील मतदार संघ...
एकही नेता गुहागरकडे फिरकलेला नाही.
धुक्याचे कारण सांगून नितीन गडकरींचा दौराही रद्द.
अंतर्गत राजकारणाचा वास
मागील पान पुढील अंक
अटीतटीच्या लढतीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्वबळावर झुंज
जिल्ह्यातील लक्षवेधी मतदार संघाकडे पक्षाचे दुर्लक्ष
पदाधिकाऱ्यांमध्ये तर्कवितर्क

राज्याचे लक्ष, पक्षाचे दुर्लक्ष?
गुहागर मतदार संघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. एका बाजूला भास्कर जाधव यांना अनेक शत्रू आहेत तर दुसऱ्या बाजूला विनय नातू यांचा एकाकी प्रचार सुरू आहे. जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे हा मतदार संघ राज्यभरातच अधिक चर्चेचा झाला आहे. गुहागरला काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

Web Title: BJP fighting alone in Guhagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.