भाजपा कार्यकारिणीत हाणामारी
By Admin | Updated: October 20, 2016 03:47 IST2016-10-20T03:47:48+5:302016-10-20T03:47:48+5:30
वादग्रस्त ओमी कलानी यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यावरून अगोदरच फूट पडलेली असताना बुधवारी पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत याच मुद्द्यावरून हाणामारी झाली.
_ns.jpg)
भाजपा कार्यकारिणीत हाणामारी
उल्हासनगर : वादग्रस्त ओमी कलानी यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यावरून अगोदरच फूट पडलेली असताना बुधवारी पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत याच मुद्द्यावरून हाणामारी झाली.
टाऊन हॉल येथे झालेल्या भाजपा शहर कार्यकारिणीच्या बैठकीत ओमी कलानी व त्यांच्या टीमला पक्षात प्रवेशावरून वाद झाला व पदाधिकारी हातघाईवर आले. वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्पुरता वाद मिटला असून शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी कलानी यांना बहुमताने भाजपा प्रवेश नाकारल्याचे प्रसिद्धिपत्रक काढले. उल्हासनगर भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला जिल्ह्याचे संघटनमंत्री सतीश धोंड, जिल्हा महासचिव व शहर प्रभारी दिगंबर विशे, आमदार गणपत गायकवाड, महासचिव प्रदीप रामचंदानी तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. भाजपाचे नेते नरेंद्र राजाणी यांचे मार्गदर्शनपर भाषण झाल्यावर जिल्हा महासचिव प्रदीप रामचंदानी हे भाषण करणार होते. कलानी यांना प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत हात वर करून मतदान घेण्यात आले, तेव्हा प्रदीप रामचंदानी, लाल पंजाबी, संजय सिंग यांच्यासह अनेकांंनी हात वर केले नाही. जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांनी प्रदीप रामचंदानी यांच्याकडे इशारा करीत काहीतरी टिप्पणी केली. त्याला रामचंदानी यांच्यासह संजय सिंग यांनी हरकत घेतली आणि वादाची ठिणगी पडली व त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. युवा नेता व महासचिव संजय सिंग यांनी आनंद शिंदे यांना धक्काबुक्की करीत मारहाण केल्याचे बोलले जाते. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी मारहाण नव्हे तर शाब्दिक चकमक झाल्याचे सांगितले.
‘गुन्ह्यांमुळे ओमीला प्रवेश नाही’
कलानी यांच्यावर एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल असल्याने अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला भाजपात प्रवेश देण्यास आयलानी यांनी विरोध केला. (प्रतिनिधी)
।‘सर्वेक्षण करून निर्णय घ्या’
महासचिव प्रदीप रामचंदानी यांनी कलानी यांना प्रवेश द्यायचा किंवा कसे, याबाबत सर्वेक्षण करण्याची मागणी केली. शिवसेनेसोबत भाजपाची युती झाली नाही, तर पक्षाची ताकद काही विभागांपुरती मर्यादित राहील. मात्र, कलानी यांना पक्षात प्रवेश दिल्यास पालिकेत एकहाती सत्ता येईल. सुरुवातीला आयलानी यांनी कलानी यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला नव्हता. मग, आताच का विरोध करीत आहेत, असा प्रश्न रामचंदानी यांनी केला.