भाजपाने फसविले - मेटे
By Admin | Updated: July 9, 2016 02:55 IST2016-07-09T02:55:21+5:302016-07-09T02:55:21+5:30
आपल्याला मंत्रिपद देण्याचा शब्द भाजपाने पाळला नाही. आपली फसवणूक केली, या शब्दांत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराला

भाजपाने फसविले - मेटे
मुंबई : आपल्याला मंत्रिपद देण्याचा शब्द भाजपाने पाळला नाही. आपली फसवणूक केली, या शब्दांत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराला तर ते अनुपस्थित होते.
भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळाले. रिपाइंचे रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाले. पण मेटेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.
ते म्हणाले की, मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता. भाजपाच्या नेत्यांनीही मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी शब्द दिला होता. असे असताना इतरांना एक न्याय आणि मला वेगळा न्याय, असे का झाले हा माझ्या कार्यकर्त्यांचा सवाल आहे. मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही संघर्ष करीत आलो आहोत. अशावेळी सन्मान मिळत नसेल तर समाजातही नाराजीची भावना होते. अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारक समितीचे मेटे हे अध्यक्ष असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. हे कारण पुढे करत त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आल्याचे म्हटले जाते. मेटे यावर म्हणाले की, स्मारक हे माझे व सर्वच मराठी माणसांचे मिशन आहे. भाजपाने मला मंत्रिपदाचा शब्द दिला होता तो पाळला नाही. आता काय भूमिका घ्यायची हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवू.