भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिला कारवाईबाबत आश्वस्त केलं. प्राजक्ता माळीच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.
अभिनेत्रीच्या समर्थनार्थ आता भाजपा नेत्या सरसावल्या आहेत. "या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते" असं म्हटलं आहे. भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी "आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे" असं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"स्त्री चा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे... त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही. आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे. या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते..." असं चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे,
"आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन
"आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहेत, प्राजक्ता ताई, ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नकोस" असं म्हणत गौतमी पाटीलने प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तसेच प्लीज कोणाबरोबरही कोणाचं नाव जोडू नका. कलाकाराला पाठिंबा द्या असंही म्हटलं. "प्राजक्ता ताई, आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत. या गोष्टीवरून ट्रोल जरी केलं तरी लक्ष देऊ नकोस. तू पत्रकार परिषदेत जे काही बोलली ते मी मगाशी ऐकलं. तू जे काही बोलली ते सगळं बरोबर होतं. मी एक कलाकार आहे. माझी एक विनंती आहे, कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्याबरोबरच नाही, तर कोणाहीबरोबर त्या कलाकाराचं नाव जोडू नका. कलाकाराचं दुःख हे कलाकाराचं माहीत असतं."