मुंबई: ईडी, आयकर विभाग आणि सीबीआयच्या कारवायांमुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वाढत चालले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या एका विधानावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यासंदर्भात भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर कारवाई केली. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे. केंद्रीय संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये या कारवाईची जोरदार चर्चा असतानाच राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी खळबळजनक विधान केले होते. याच विधानावरुन चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.
ये डर होना जरुरी है
चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचा थेट उल्लेख न करता ट्विटरवरुन अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काही जण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत… ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है… ये डर होना जरुरी है!, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. या ट्विटमध्ये त्यांनी ईडी असा हॅशटॅगही वापरला आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
मी काही चुका केलेल्या नाहीत. परंतु वरच्या टेपिंगमध्ये वगैरे काही चुका असतील तर मला कल्पना नाही. कोणी बोलो न बोलो पण भीती ही माणसाला खात असते, हे मी अगदी स्पष्टपणाने बोलतो. रात्री जर तीन वाजता दारावर टकटक जरी झालं तरी हार्टअॅटॅक येण्याच्याच शक्यता असतात. कोण कोणाच्या घरात घुसेल हे ध्यानीमनीही नाही. यात सर्वाधिक हाल हे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो त्यांचेच होतात. माझ्या मुलीचा राजकारणाशी काही संबंध नाही. पण ती किती ठिकाणी डायरेक्टर आहे. तिला जर उद्या नुसते बोलावले तरी ती आत्महत्या करेल. त्यांना असल्या सवयी नाही, ते फ्री बर्ड्स आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.