भाजपाने ‘ती’ जाहिरात गुंडाळली सर्वत्र खिल्ली : सोशल मीडियावर उडाली यथेच्छ टर
By Admin | Updated: October 10, 2014 05:14 IST2014-10-10T05:14:59+5:302014-10-10T05:14:59+5:30
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे नकारात्मक सूरातील जाहिरात कॅम्पेन गुंडाळण्याची नामुष्की भाजपावर आली असल्याचे समजते

भाजपाने ‘ती’ जाहिरात गुंडाळली सर्वत्र खिल्ली : सोशल मीडियावर उडाली यथेच्छ टर
मुंबई : ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे नकारात्मक सूरातील जाहिरात कॅम्पेन गुंडाळण्याची नामुष्की भाजपावर आली असल्याचे समजते. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर सर्वप्रथम भाजपामधील विसंवाद उघड झाला. त्या पाठोपाठ पन्नासहून अधिक उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीतून ‘आयात' केल्याने भाजपाचा स्वबळाचा फुगा फुटला. आता भाजपाच्या जाहिरात कॅम्पेनची सोशल मीडियावर यथेच्छ टर उडवली गेल्याने ते गुंडाळण्याचा निर्णय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचाराची धुरा असतानाही भाजपाची प्रचाराची गाडी रुळावरून घसरली आहे.
महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था यासारख्या समस्यांवर संतप्त स्वरात बोलून ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' असा नकारात्मक सवाल करणारे जाहिरात कॅम्पेन भाजपाने सुरु केले होते. मात्र या कॅम्पेनची टर उडवताना ‘कुठं नेला चार्जर माझा’ यापासून ते ‘कुठं नेला अॅडमिन माझा' असे संदेश गेले आठवडाभर फिरत होते. भाजपाने लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आयेंगे' असे कॅम्पेन केले होते. लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे जाहिरात कॅम्पेन पियुष पांडे यांनी केले होते.
यावेळीही त्यांनाच जाहिरातीची सूत्रे दिली होती. मात्र यावेळी भाजपा सपशेल तोंडावर आपटल्याने दिवसभर सर्वच वाहिन्यांवर भाजपाच्या ‘कुठं नेऊन ठेवला'च्या जाहिराती दाखवण्यात येत नव्हत्या. त्या जाहिराती हा कॅम्पेनचा पहिला टप्पा होता. नवीन जाहिराती लवकर सुरु होतील, असा खुलासा भाजपाने केला. मात्र प्रचाराला अत्यल्प कालावधी असताना जुन्या जाहिराती बंद करून नव्या सुरु झाल्या नाहीत याची चर्चा सुुरु होती. मोदींच्या अमेरिकेतील भाषणाची एकमेव जाहिरात दिवसभर सुरु होती.