राज्य तोडण्याचा भाजपचा डाव

By Admin | Updated: October 11, 2014 00:26 IST2014-10-11T00:22:23+5:302014-10-11T00:26:19+5:30

अजित पवार : सत्ता मिळविण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी; आर. के. पोवार यांच्या प्रचारार्थ सभा

BJP to break state | राज्य तोडण्याचा भाजपचा डाव

राज्य तोडण्याचा भाजपचा डाव

कोल्हापूर : विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र हा गुजरातपेक्षा कितीतरी पटींनी पुढे असताना केवळ सत्ता मिळविण्यासाठी राज्याची बदनामी करणाऱ्या व राज्य तोडण्याचा डाव आखणाऱ्या भाजपला मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, शुक्रवारी रात्री येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना केले. पवार काका-पुतण्यांना उभा महाराष्ट्र ओळखतो; त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी ओळख करून देण्याची गरज नाही, अशा शब्दांत पवार यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
कोल्हापुरातील पापाची तिकटी चौकात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आर. के. पोवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती. विरोधी पक्षांनी निवडणुकीत जरूर मते मागावीत, लोकांसमोर आपली भूमिका मांडावी; परंतु राज्याची बदनामी करून मते मागण्याचा कोणाला अधिकार नाही. गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्राची जाहिरातींच्या माध्यमातून भाजपवाल्यांनी प्रचंड बदनामी केली. नळाला पाणी येण्याऐवजी हवाच येते, असे एका जाहिरातीत दाखविले; परंतु नळाला पाणी येण्याऐवजी आधी हवाच येते आणि मग पाणी येते, हेच यांना कळत नाही. एका जाहिरातीत वाकड्या तोंडाचा शेतकरी दाखवून तमाम शेतकऱ्यांचाही अपमान केला, असे पवार म्हणाले.
एकीकडे जनता बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी करीत असताना भाजपचे राज्यातील नेते स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन जनतेला देत आहेत. यांना राज्य तोडण्याचा अधिकार कोणी दिला, याचा जाब जनतेने विचारण्याची आवश्यकता आहे, असे सांगून पवार म्हणाले की, लोकसभेला जी आश्वासने दिली ती गेल्या सहा महिन्यांत पाळली नाहीत. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला प्रभू रामचंद्राची आठवण यायची. हिंदुत्वाची आठवण यायची; पण आता हे रामाला विसरले. आता यांना शिवाजी महाराजांची आठवण आली. उद्या निवडणुका संपल्यावर त्यांनाही विसरतील.
चीनची घुसखोरी सुरू आहे. पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. परंतु तिकडे लक्ष देण्याऐवजी मोदी हे केवळ महाराष्ट्रातील निवडणुकीत अडकून पडले आहेत. त्यांचा महाराष्ट्राकडील ओढा कमी होत नाही, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीला ताकद द्या : धनंजय महाडिक
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, आमदारांनी शेकडो कोटींचा निधी कोल्हापूरच्या विकासासाठी आणला आहे. अशाच प्रकारचे काम कोल्हापूर उत्तरमध्येही होण्यासाठी आर. के. पोवार यांना तसेच राष्ट्रवादीला ताकद द्या, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले.

एक रस्ता केल्याचे दाखवा : लाटकर
शहराच्या आमदारांनी एक रस्ता चांगला केल्याचे दाखवावे, आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देतो. शहरात कोणती विकासकामे केली हे बिंदू चौकात येऊन सांगा, असे आव्हान नगरसेवक राजू लाटकर यांनी यावेळी दिले. आमदारांनी उठसूट ‘कोल्हापूर बंद’ केले. ठेकेदारांनी दमबाजी केली, असेही लाटकर म्हणाले.

फक्त दमबाजीच : पोवार
स्थानिक आमदारांनी पोलिसांना, अधिकाऱ्यांना नुसती दमबाजीच केली. कोल्हापूर चौदावेळा बंद पाडले. गेल्या पाच वर्षांत हेच काम त्यांच्याकडून झाले, असे आर. के. पोवार म्हणाले.

Web Title: BJP to break state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.