31 ऑक्टोबरपर्यंत आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 14:50 IST2017-06-06T14:18:32+5:302017-06-06T14:50:48+5:30
31 ऑक्टोबरपर्यंत गरजू शेतक-यांना कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे

31 ऑक्टोबरपर्यंत आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी - मुख्यमंत्री
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - 31 ऑक्टोबरपर्यंत गरजू शेतक-यांना कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसंच जी कर्जमाफी देऊ ती आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल असंही ते बोलले आहेत. ख-या शेतक-यांशी, शेतकरी नेत्यांशी चर्चा करु, आमचे विरोधक असले तरी चर्चा करु असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. जे ख-या अर्थाने शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांच्याशीच चर्चा होऊ शकते. शेतक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणा-यांशी नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. तसंच हिंसक घटनांमागे कोणता पक्ष आहे याची माहिती आहे सांगत पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
"सर्व पक्षांना समोर ठेऊन सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देणार", असं जाहीरपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. "सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. 31 ऑक्टोबरपुर्वी महाराष्ट्रातील अडचणीत असलेल्या, गरजू शेतक-यांना कर्जमाफी देणार. यात कोण असावं, कोण नाही, ती कशी असावी यासाठी 4 महिन्यांचा वेळ घेण्यात आला आहे", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
"याआधी कर्जमाफीत घोटाळा झाला असल्याचं कॅगने सांगितलं आहे. त्यामुळेच आयटी बेस सिस्टीम तयार करण्यात येणार आहे", असं मुख्यमंत्री बोलले आहेत.
48 तासांत कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू - शेतकरी
दुसरीकडे राज्यात शेतक-यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेलं आंदोलन अद्यापही सुरु आहे. संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त झुगारुन आंदोलक शेतकऱ्यांनी परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कलूप लावलं व आपल्या भावना प्रशासनासमोर मांडल्या.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी किसान क्रांती समन्वय समितीने जिल्ह्यात सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर मंगळवारी शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकून शेतकऱ्यांच्या भावना प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले.
संपकरी शेतकऱ्यांनी सोमवारी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील शेतक-यांनी पुकारलेल्या संपाची झळ आता शेजारील राज्यांनाही सोसावी लागत असल्याचे दिसत आहे. शेतक-यांच्या संपामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून त्यांचे दरही गगनाला भिडले आहेत.
अहमदाबादमध्ये भाजीपाल्यांच्या किंमत गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दुप्पट झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी दुधाचे 27 टँकर्सं झेड श्रेणी सुरक्षेत मुंबईत आणण्यात आले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. १ जूनपासून शेतक-यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. आज शेतक-यांनी टाळेठोक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाद्वारे शेतकरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयानं कुलूप ठोकत आहेत.