सेन्सेक्सची मोठी आपटी

By Admin | Updated: April 29, 2016 05:24 IST2016-04-29T05:24:42+5:302016-04-29T05:24:42+5:30

मुंबई शेअर बाजारात दोन दिवसांपासून आलेल्या तेजीला ब्रेक लागला

The biggest challenge of the Sensex | सेन्सेक्सची मोठी आपटी

सेन्सेक्सची मोठी आपटी

मुंबई : बँक आॅफ जपानने बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी भांडवल न देण्याचा निर्णय घेतल्याने आणि गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने मुंबई शेअर बाजारात दोन दिवसांपासून आलेल्या तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ४६१ अंकांनी घसरून २५,६0३ अंकांवर, तर निफ्टी १३३ अंकांनी घसरून ७,८४७ अंकांवर आला. सेन्सेक्समध्ये गेल्या तीन आठवड्यांतील एकाच दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे.
आज जागतिक बाजारात निराशाजनक वातावरण होते. बुधवारी रात्री अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला, तर गुरुवारी बँक आॅफ जपाननेही तसाच निर्णय घेऊन व्याजदर शून्याने 0.१0 टक्कादरम्यान कायम ठेवून सर्वांना चकित केले.
शिवाय बँकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतेही भांडवल न ओतण्याचा निर्णय घेतला. बँक आॅफ जपानकडून व्याजदर कपातीची अपेक्षा होती, तसे झाले नाही. या दोन्ही निर्णयांचा बाजारावर विपरीत परिणाम झाला.
विदेशी बाजारात असलेल्या स्थितीने मुंबई शेअर बाजार दबावाखाली आला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २७ कंपन्या तोट्यात गेल्या आणि केवळ टीसीएस, अ‍ॅक्सिस बँक, ल्युपिन या कंपन्यांचे शेअर्सच वधारले. सर्वात जास्त ३.२१ टक्के घसरण एचडीएफसीमध्ये झाली. त्यानंतर अन्य टीसी आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअरही तीन टक्क्यांनी घसरले. बीएसईतील सर्व २0 समूह तोट्यात राहिले.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमधील ५१ पैकी ४२ कंपन्यांत विक्रीचा जोर राहिला. प्रारंभी, सेन्सेक्स १४.१६ अंकांनी वधारून २६,0७८.२८ अंकांवर खुला झाला. दिवसभरात तो २६,१00.५४ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला; पण त्यानंतर जागतिक दबावाखाली गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केल्याने बाजार पुन्हा सावरू शकला नाही. बुधवारच्या तुलनेत तो १.७७ टक्क्याने म्हणजे ४६१.0२ अंकांनी घसरून १२ एप्रिल रोजी असलेल्या २५,६0३.१0 अंकांवर आला. ५ एप्रिलनंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
‘निफ्टी’ही प्रारंभापासून दबावात राहिला. बुधवारी बाजार बंद होताना असलेल्या भावाच्या तुलनेत १२.५0 अंकांनी घसरला.
७,९६७.४0 वर खुला झाला. काही वेळातच तो ७,९९२ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला; पण त्यानंतर येथेही विक्री सुरू झाली आणि शेवटी १.६६ टक्क्यांनी म्हणजे १३२.६५ अंकांनी घसरून ७,८४७.२५ अंकांवर बंद झाला.
>विदेशी बाजारातही पडझड
दिवसभरात मध्यम आणि छोट्या कंपन्यांवर कमी दडपण राहिले. बीएसईत एकूण २६९६ कंपन्यांच्या शेअरमध्ये व्यवसाय झाला. त्यापैकी १६९६ कंपन्यांत घसरण झाली, तर ८३५ कंपन्यांचे शेअर वधारले. १६५ कंपन्यांच्या शेअरमध्ये काहीही बदल झाला नाही.
विदेशी बाजारात ब्रिटनचा एफटीएसई प्रारंभीच 0.९१ टक्क्यांनी घसरला. जवानचा निक्केई ३.६१ टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.७२ टक्के, चीनचा शांघाय कंपोझिट 0.२५ टक्के घसरले. मात्र हाँगकाँगचा हँगसँग 0.१२ टक्क्यांनी तेजीत राहिले.

Web Title: The biggest challenge of the Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.