Maharashtra Politics: “शिवसेना-शिंदे गटाला स्वार्थ साधायचाय, जनतेने दसरा मेळाव्याला जाऊच नये”; बिचुकले स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:09 PM2022-09-12T23:09:24+5:302022-09-12T23:10:08+5:30
राज्यातील राजकारण जनतेच्या हिताचे नाही, तर कोण मोठा यावरुनच सुरु आहे, अशी टीका अभिजित बिचुकले यांनी केली आहे.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीति आखल्याचेही बोलले जात आहे. यातच आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तसेच जनतेचे दसरा मेळाव्याच्या सभेला जाऊच नये, असा सल्लाही दिला आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अभिजित बिचुकले प्रतिक्रिया देत असतात. स्पष्टपणे आपली मते मांडत असतात. तसेच आपल्या वक्तव्यांमुळे अभिजित बिचुकले चर्चेतही असतात. राज्यातील राजकीय संघर्षाचा पुढचा अंक ठरत असलेल्या दसरा मेळाव्यावरही बिचुकलेंनी रोखठोक भाष्य केले आहे. सध्या राज्यात सुरु असलेले राजकारण हे जनतेच्या हिताचे नाही तर कोण मोठा यावरुनच सुरु आहे, असे बिचुकलेंनी म्हटले आहे.
जनतेने सभा ऐकायलाच जाऊ नये
शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहेत.राज्यात एकच चर्चा असून दसरा मेळाव्यावरून राजकारण सुरु आहे. पण यामध्ये दसऱ्याचे कुणाला काही देणे-घेणे नाही. शिवसेना आणि शिंदे गटाला राजकीय स्वार्थ साधायचा आहे. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला ठेऊन दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावरुन राजकारण केले जात आहे, या शब्दांत हल्लाबोल करत जनतेला सभा ऐकालाच जाऊ नका, असा सल्ला दिला असून, यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवतीर्थावर दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची परंपरा आहे. दसऱ्या दिवशी या मैदानावरुन शिवसैनिकांना संबोधित केले जाते. पण यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केला आहे. आपलीच खरी शिवसेना या हेतूने शिंदे गटाने हा अर्ज केला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी दसरा मेळावा कुठे घेणार यावरुन सूचक वक्तव्य केलेली आहेत. शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा होणार अद्याप स्पष्ट झालेले नाही.